मुख्यमंत्र्यांची माहिती : समारोप सोहळा नेहमीप्रमाणे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यातील पणजीत होणाऱ्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन वेगळ्या पद्धतीने होणार आहे. शिमगा व कार्निवलची झलक प्रदर्शित करण्याच्या हेतूने जुने सचिवालय ते मनोरंजन संस्थेच्या इमारतीपर्यंत चित्ररथ मिरवणूक होईल. यानंतर मनोरंजन संस्था इमारतीबाहेरच्या स्टेजवर औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पर्वरी येथील मंत्रालयात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. फिडे आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा सुरू असल्यामुळे ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम इफ्फीच्या उद्घाटनासाठी उपलब्ध राहणार नाही. असे असले तरी इफ्फीचा समारोप सोहळा नेहमीप्रमाणे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे. समारोप सोहळ्यात सुपरस्टार रजनीकांत याचा विशेष गौरव केला जाणार आहे. याशिवाय ‘सुवर्णमयूर’, ‘रौप्यमयूर’, ‘कांस्यमयूर’ या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. इफ्फीचे उद्घाटन नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने व्हावे, अशी सूचना आयोजकांकडून आली होती. शिमगोत्सव व कार्निवल ही गोव्याची संस्कृती आहे. तिचे दर्शन चित्रपट जगताला व्हावे, यासाठी यंदा चित्ररथ मिरवणुकीने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. मिरवणुकीत १२ सरकारी, तर ११ चित्रपट निर्मात्यांचे चित्ररथ असतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
कोळशाचे प्रमाण वाढलेले नाही
राज्यात कोळसा हाताळणीचे प्रमाण वाढलेले नाही. केंद्र व राज्य सरकारने कोळसा हाताळणीबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. कोळशाचे प्रमाण १ टनानेही वाढणार नाही. मडगावची सभा कोळशावर होती की आणखी कशासाठी, ते मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोळशाच्या विरोधात मडगावात झालेल्या सभेवर व्यक्त केली.
नोकरीच्या बदल्यात पैसे : फोंड्यातील घटनेचा नव्याने तपास
नोकरीच्या बदल्यात पैसे देण्याचा प्रकार फोंड्यात घडला होता, त्याची नव्याने एफआयआर नोंद करून तपास होणार आहे. आणखी नवीन नावे आली तर त्यांचीही चौकशी केली जाईल. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी योग्य प्रकारे चौकशी झाली नसल्याचे माझ्या कानावर घातले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पूजा नाईकवर विश्वास ठेवता येत नाही : सुदिन ढवळीकर
नोकरीच्या बदल्यात पैसे प्रकरणातील संशयित पूजा नाईक स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी नव्याने आरोप करण्याची शक्यता आहे. तिच्यावर माझा विश्वास नाही. तरीही आरोपांची चौकशी गुन्हा शाखेने करायला हवी. गुन्हा शाखा चौकशी करत आहे. नोकरीच्या बदल्यात पैसे देण्याचा प्रकार फोंड्यात घडला होता, त्याची पोलिसांनी योग्य प्रकारे चौकशी केली नाही, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी नुकतेच म्हटले आहे.