२४ जण जखमी, अनेक वाहनांचे नुकसान; गोव्यासह इतर राज्यांत सतर्कतेचा आदेश

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी शक्तिशाली कार स्फोट झाला. यात ११ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. स्फोटनंतर उडालेल्या भडक्यात अनेक वाहनांचेही मोठे नुकसान झाले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. स्फोटानंतर दिल्ली, मुंबई, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
स्फोटानंतर लगेचच पोलिसांनी परिसराला घेराव घातला. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी दाखल होऊन तपास केला. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले जात आहेत. एनआयए आणि एनएसजीचे अधिकारीही घटनास्थळी दाखल होऊन तपास करत आहेत.
दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी सांगितले की, फोर्ट मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ सायंकाळी ६.५२ वाजता लाल दिव्याजवळ एका हळू चालणाऱ्या गाडीत स्फोट झाला. गाडीत प्रवासी होते. इतर वाहनांनाही याचा फटका बसला. दिल्ली पोलीस, एफएसएल, एनआयए आणि एनएसजी या सर्व एजन्सींच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तपास सुरू आहे.
घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सायंकाळी एलएनजेपी रुग्णालयात जाऊन स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तींची विचारपूस केली. त्यानंतर रात्री ते घटनास्थळी दाखल झाले.
सर्व बाजूंनी तपास सुरू : अमित शहा
स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, स्फोटात काही लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली गुन्हे शाखा आणि विशेष शाखेची पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. एनएसए पथक सखोल चौकशी करत आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मी दिल्ली पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
आग आटोक्यात आणली : अग्निशमन अधिकारी
उपमुख्य अग्निशमन अधिकारी ए.के. मलिक म्हणाले, चांदणी चौक मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही तातडीने घटनास्थळी सात गाड्या पाठवल्या. सायं. ७.२९ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. आमच्या सर्व टीम घटनास्थळी उपस्थित आहेत.
उत्तर प्रदेशात ‘हाय अलर्ट’
दिल्लीतील स्फोटानंतर उत्तर प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) अमिताभ यश म्हणाले की, पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना संवेदनशील धार्मिक स्थळे, संवेदनशील जिल्हे आणि सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व सुरक्षा संस्थांना सतर्क करण्यात आले आहे. अयोध्या, काशी आणि मथुरासारख्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. मंदिरे, बाजारपेठा, रेल्वे स्थानके आणि सार्वजनिक ठिकाणे यासारख्या संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवली आहे.
बिहारमध्ये गर्दीच्या ठिकाणी कडक तपासणी
बिहारमधील पोलीसही ‘हाय अलर्ट’वर आहेत. गर्दीच्या ठिकाणी कडक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी भारत-नेपाळ सीमेवर पाळत वाढवण्यात आली आहे. ११ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत सीमा सील करण्यात आली होती. तथापि, नेपाळमध्ये राहणाऱ्या बिहारमधील लोकांना प्रवेश दिला जात आहे. पश्चिम आणि पूर्व चंपारण, शिवहर, सीतामढी, मधुबनी, सुपौल, अररिया, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, भागलपूर, बांका, जमुई, नवादा, गयाजी, जेहानाबाद, अरवाल, औरंगाबाद, रोहतास आणि कैमूर जिल्ह्यातील १२२ जागांसाठी मतदान होणार आहे.
गोव्यातही सतर्कतेचा आदेश
दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. संंवेदनशील स्थळांवर अतिरिक्त पोलीस तैनात करण्यासह नाकाबंंदी करण्याचा गोवा पोलिसांंकडून बिनतारी संंदेश देण्यात आला आहे.