मडगाव: असोळणा येथून बेतूलच्या दिशेने जात असताना तळेकट्टा, वेळ्ळी येथे एका दुचाकीचा स्वयंअपघात झाला. यात कारशेता-वेळ्ळी येथील दुचाकीचालक साईश कोळवेंकर (२५) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दुचाकीवरील ताबा सुटला
मिळालेल्या माहितीनुसार, साईश कोळवेंकर हा युवक आपल्या ताब्यातील एव्हीएटर दुचाकी घेऊन असोळणा येथून बेतूलच्या दिशेने जात होता. दुचाकी तळेकट्टा वेळ्ळी येथील सेंट रॉक हायस्कूलनजीक आली असता त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला व साईश रस्त्यावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला.
अनैसर्गिक मृत्यूची नोंद
गंभीर जखमी झालेल्या साईश याला उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण नोंद केली आहे. शवचिकित्सेनंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आदित्य सावंत पुढील तपास करत आहेत.


