पणजी: राज्यात मागील चार दिवसांत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा खून करण्यात आला आहे. यातील मोरजी येथील प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली, तर साळगाव येथील दुहेरी हत्याकांडातील संशयित अद्याप सापडलेला नाही. या पार्श्वभूमीवर, राज्यातील या वर्षातील गंभीर गुन्ह्यांची उकल ९५.८५ टक्के झाली असली, तरी सात गंभीर गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही.
मोरजी प्रकरण: तिघांना अटक, मुख्य सूत्रधार फरार
वरचावाडा-मोरजी येथील उमाकांत खोत (६४) या वृद्धाचा बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी दुपारी संशयास्पद मृत्यू झाला होता. जमिनीच्या वादातून बिगर गोमंतकीयांकडून त्यांचा खून झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर मांद्रे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू करत लोकेश पुत्तास्वामी, रोहित कुमार प्रजापती आणि विजी सुप्पन या तिघा संशयितांना अटक केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथा संबंधित मोरजीतील सर्वे क्र. १५६/३ चा जमीन मालक अशोक कुमार नेदुरुमली हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
साळगाव दुहेरी हत्याकांड: संशयिताचा शोध सुरू
दरम्यान, साळगाव येथे गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी मुड्डोवाडा-साळगाव भागात रिचर्ड डिमेलो (गिरी-बार्देश) याच्यासह अभिषेक गुप्ता (इंदोर, मध्य प्रदेश) या कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला. साळगाव पोलिसांनी तपास सुरू केला असून, डिमेलो याचा फरार कामगार जगन्नाथ याच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. मोरजी आणि साळगाव येथे घडलेल्या या खुनाच्या घटनांनी संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
वर्षातील १६९ गंभीर गुन्ह्यांची नोंद
राज्यातील गंभीर गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, या वर्षी १ जानेवारी ते ६ नोव्हेंबरपर्यंत २६ खुनाच्या घटना घडल्या आहेत, त्यातील एका खुनाचा तपास लागलेला नाही. याशिवाय बलात्काराचे ८९ गुन्हे दाखल झाले असून, त्यातील तीन गुन्ह्यांचा तपास बाकी आहे. तसेच, प्राणघातक हल्ल्याचे ३१, सदोष मनुष्यवधाचे ११, दरोडे ४ आणि ८ जबरी चोरी, असे एकूण १६९ गंभीर गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी एकूण सात गुन्ह्यांचा (तीन बलात्कार, दोन दरोडे, एक खून आणि एक जबरी चोरी) तपास लागलेला नाही. त्यामुळे तपासाची एकूण टक्केवारी ९५.८५ टक्के एवढी आहे.


