जप्त केळींची परस्पर विक्री केल्याने म्हापसा पोलिसांकडून तिघांना अटक, सुटका

एफडीएने केली होती दीड टन केळी जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th June, 12:35 am
जप्त केळींची परस्पर विक्री केल्याने म्हापसा पोलिसांकडून तिघांना अटक, सुटका

म्हापसा : येथील मार्केट सबयार्डमधील कृत्रिमरित्या पिकवल्याच्या संशयावरून एफडीएने जप्त केलेली सुमारे दीड टन केळी परस्पररित्या काहींना विकून मानवी जीवन धोक्यात घातल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. नंतर वैयक्तिक हमीवर त्यांची सुटका करण्यात आली. 

अटक केलेल्या संशयितांमध्ये नूर अहमद येल्लेपुतीन, इम्तियाज अल्दूलसाब तोंदूर (रा. दोघेही बेती बार्देश) व म्नबूल अहमद येल्लेपुतीन (रा. पेद्रोवाडा रायबंदर) यांचा समावेश आहे.

याप्रकरणी अन्न व औषधे प्रशासनचे अन्न सुरक्षा अधिकारी अमित मांद्रेकर यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दिली आहे. सोमवार, ९ रोजी सायंकाळी फिर्यादींसह अन्न व औषधे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हापसा मार्केट सब यार्डमधील एस-३९ दुकानाची पाहणी केली होती. येथील केळी विक्री दुकानात रासायनिक द्रव्य सापडले होते. त्यामुळे दुकानातील केळी सदर रसायनाद्वारे कृत्रिमरित्या पिकवली गेल्याचा संशय आल्याने दुकानातील सुमारे दीड टन पेक्षा जास्त केळी साठा एफडीएने जप्त केला होता. तसेच सदर केळींचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवले होते. एफडीएची पूर्वसूचना येईपर्यंत सदर केळींची विक्री न करणे, तसेच दुकान आणि दुकानातील भट्टी बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता.

तरीही वरील संशयितांनी केळी गाडी भरून हलविली आणि परस्पररित्या त्यांची विक्री केली.

जप्त केलेली केळी सुरक्षित ठेवण्याची सूचना देऊएनही संशयितांनी समान हेतूने कृत्रिमरित्या पिकवलेल्या या केळींची वाहतूक करून ती जनतेला विकली. तसेच एफडीएकडून दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करून जाणुनबुजून व निष्काळजीपणे पिकवलेली केळी विकून मानवी जीवन धोक्यात घातले, अशा आरोपाखाली पोलिसांनी भा.न्या.सं.च्या १२५, २२३, २७४, २७५, ३२६,(अ), ३(५), तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ च्या कलम ५०, ५१, ५४, ५५, ५६, ५७, ५९ व ६० कलमान्वये गुन्हा नोंदवून संशयितांना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

म्हापसा पोलिसांत तक्रार

जप्त केलेली केळी विकल्याचा प्रकार एफडीए अधिकाऱ्यांना मंगळवारी १० रोजी दुपारी आढळून आला. त्यांनी दुकान मालक संशयित नूर अहमद याच्याकडे विचारपूस केली. मात्र त्यांनी योग्य उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर म्हापसा पोलिसांत तक्रार केली व संशयितांना पोलिसांच्या स्वाधीन केले. 

हेही वाचा