केशव राम चौरसियांनी घेतला महानिरीक्षकपदाचा ताबा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th June, 12:21 am
केशव राम चौरसियांनी घेतला महानिरीक्षकपदाचा ताबा

पणजी : हल्लीच गोव्यात बदली झालेले भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) अॅग्मू केडरच्या २००३ बॅचचे केशव राम चौरसिया गोवा पोलीस सेवेत रूजू झाले आहेत. त्यांनी नवीन पोलीस महानिरीक्षक म्हणून ताबा घेतला आहे.

भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) अधिकारी केशव राम चौरसिया यांची हल्लीच केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्लीतून गोव्यात बदली केली होती. गोव्यात बदली होण्यापूर्वी चौरसिया यांनी दिल्लीत दक्षता आणि आर्थिक विभागाचे संयुक्त आयुक्तपदी सेवा बजावली आहे. ते जम्मू आणि काश्मीर पोलीस सेवेत रूजू झाले. त्यानंतर २२ डिसेंबर २००३ रोजी त्यांची भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) नियुक्ती केली. ते जम्मू आणि काश्मीर केडर २००३ बॅचचे अधिकारी होते. त्यांनी विविध पदांवर सेवा बजावल्यानंतर १ जून २०१२ मध्ये त्यांची केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागात (सीबीआय) अधीक्षकपदी प्रतिनियुक्ती करण्यात आली. त्यांनी कोळसा खाण वाटप प्रकरणाची चौकशी केली. त्यांना जून २०१७ मध्ये उपमहानिरीक्षकपदी बढती देण्यात आली. त्यानंतर ते पुन्हा जम्मू आणि काश्मीर पोलीस सेवेत रूजू झाले. जम्मू आणि काश्मीर संघ प्रदेश झाल्यानंतर त्यांची अॅग्मू केडरमध्ये नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांची बदली दिल्ली पोलीस सेवेत करण्यात आली.

आयपीएस अधिकारी केशव राम चौरसिया यांचा जन्म ९ आॅक्टोबर १९७९ रोजी उत्तर प्रदेशमध्ये झाला. त्यांनी एम. ए. पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी उल्लेखनीय आणि प्रशंसनीय सेवा बजावल्यामुळे त्यांना २०२२ मध्ये राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम) देण्यात आले. 

हेही वाचा