दोडामार्गः फणस काढण्यासाठी गेलेल्या इसमावर अस्वलाचा हल्ला

मांगेलीत भीतीचे वातावरण, वटपौर्णिमेच्या दिवशी घडली दुर्घटना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th June, 04:04 pm
दोडामार्गः फणस काढण्यासाठी गेलेल्या इसमावर अस्वलाचा हल्ला

दोडामार्ग : वटपौर्णिमेनिमित्त बागेत फणस काढण्यासाठी गेलेल्या विष्णू लाडू गवस (वय ४९, रा.मांगेली फणसवाडी, दोडामार्ग) या व्यक्तीवर अस्वलाने हल्ला चढवून त्याला जखमी केल्याची घटना मंगळवारी सकाळी घटली. हल्ला करताच विष्णू गवस यांनी आरडाओरड केल्याने अस्वलाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या हल्ल्यात गवस यांच्या मांडीला जखम झाली असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी स्थानिकांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर तिथून अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे दाखल केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की विष्णू गवस हे वटपौर्णिमेच्या सणाला नैवेद्यासाठी लागणारे फणस काढण्यासाठी बागेत गेले होते. नेमके याचवेळी फणसाच्या झाडाच्या बाजूला अस्वल फणस खात होते हे त्यांच्या निदर्शनास आले नाही. गवस फणस काढण्यासाठी झाडाजवळ पोहोचले असता अस्वलाने  त्यांच्यावर हल्ला चढवला.

त्यावेळी अस्वलाच्या तावडीतून जीव वाचवण्यासाठी पळताना अस्वलाने विष्णू गवस यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर पंजाने हल्ला केला. अस्वलाची नखे मांडीला लागल्याने गवस रक्तबंबाळ झाले. त्यांनी घाबरून जीव वाचविण्यासाठी आरडाओरड सुरू केल्यावर अस्वलाने तिथून पळ काढला.

अस्वलाच्या हल्ल्यात रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या विष्णू गवस यांना स्थानिकांनी उपचारासाठी दोडामार्ग रुग्णालयात आणले. डॉ. अनिकेत गुरव यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गवस यांना गोवा बांबोळी येथे पाठविण्यात आले आहे.

मांगेली गावालगत वनक्षेत्र असून यापूर्वीही अस्वलाने बऱ्याच जणांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या होत्या. हत्ती, अस्वलासारखे वन्यप्राणी दिवसाढवळ्या थेट मानवी वस्तीपर्यंत फिरू लागल्याने स्थानिक, ग्रामस्थ व पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना भीतीचे वातावरण बनले आहे. त्यामुळे वनविभागाने याचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी मांगेलीवासियांनी केली आहे.                                                                

हेही वाचा