उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश जारी
पणजी : मुंडकार खटल्यांच्या सुनावणीसाठी शनिवारी काम करणाऱ्या महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी काम केल्याबाबत भरपाई रजा (कॉम्प ऑफ) मिळणार आहे. याबाबत उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकताच आदेश जारी केला आहे. कर्मचाऱ्यांना शनिवारी दर दोन तासांनी बायो मेट्रिक यंत्रावर उपस्थितीत लावावी लागणार आहे. यानंतर मामलेदारांच्या परवानगीने आणि नियमांनुसारच कॉम्प ऑफ मिळणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.
आदेशात म्हटले आहे की, मानवाधिकार आयोगच्या शिफारसीनुसार आदेशातील कॉम्प ऑफ न देण्याबाबतचा भाग वगळण्यात आला आहे. मात्र कर्मचाऱ्यांना कॉम्प ऑफ मिळण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. शनिवारी कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर दोन तासांनी बायो मेट्रिक उपस्थिती लावणे आवश्यक आहे. मामलेदार किंवा संयुक्त मामलेदारांनी याची खात्री करणे आवश्यक आहे. यानंतरच पात्रतेनुसार व नियमांनुसार कॉम्प ऑफ देण्यात येणार आहे.
‘कॉम्प ऑफ’वरून वाद, तोडगा...
- उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने ३० ऑक्टोबर २०२४ मध्ये एक आदेश काढून उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शनिवारी उपस्थित राहण्याचा आदेश काढला होता. या आदेशात शनिवारी काम केल्याबद्दल कॉम्प ऑफ देण्यात येणार नसल्याचे म्हटले होते.
- या विरोधात बार्देश, पेडणे, तिसवाडी, डिचोली आणि सत्तरी तालुक्यातील मामलेदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निनावी पद्धतीने मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती.
- आयोगाने केंद्रीय लोकसेवा रजा नियम, केंद्रीय अर्थ खात्याचा आदेश यांचा दाखला देत गॅझेटड अधिकारी वगळता सुट्टीच्या दिवशी काम केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना कॉम्प ऑफ देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते.