शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांची माहिती
पणजी : मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असताना देखील शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षा पर्यटनासाठी चरावणे धबधब्यावर नेत त्यांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल शिवोलीतील सेंट फ्रान्सिस झेवियर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्यवस्थापनावर कारवाई करण्याचा निर्णय सरकारच घेईल. सरकारच्या आदेशानंतरच शिक्षण खात्याने सदर व्यवस्थापनाला नोटीस पाठवली असून विद्यालयानेही त्यावर आपले स्पष्टीकरण पाठविले आहे. अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश जिंगडे यांनी दिली आहे.
शिवोलीतील सेंट फ्रान्सिस झेवियर उच्च माध्यमिक विद्यालयाने सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस कोसळत असतानाही सत्तरीतील चरावणे धबधब्यावर वर्षापर्यटन व स्वच्छता मोहीमेचे आयोजन केले होते. पावसामुळे धबधब्यावरील पाण्याची पातळी वाढली व सहलीला गेलेले ४७ विद्यार्थी व ५ शिक्षक अडकून पडले. अग्निशामक दल व वन खात्याच्या जवानांनी तत्काळ धाव घैत शिक्षक व विद्यार्थ्यांची सूटका केली होती.
शाळा व्यवस्थापनाने पूर्वीच्या नोटिशीनंतर माफी वा दिलगिरी व्यक्त केली असती तर कारवाईसाठी पुन्हा नोटीस बजावण्याची वेळ आली नसती. व्यवस्थापनाने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त न करता उलट तत्परतेने मदत करणाऱ्या अग्निशमन दल व रान खात्याने फक्त श्रेय घेतल्याचा आरोप केला. यामुळे कारवाईसाठी पुन्हा नोटीस बजावण्याची वेळ शिक्षण खात्यावर आली. व्यवस्थापनाकडून जे उत्तर आलेले आहे, ते सरकारला पाठविले जाईल. सरकारी पातळीवरच कारवाईबाबत निर्णय होणार असल्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी स्पष्ट केले.