‘एसटी’ समाजाला राजकीय आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा

कायद्याची अधिसूचना जारी : ६ ऑगस्ट २०२६ पासून अंमलबजावणी सुरू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th August, 11:29 pm
‘एसटी’ समाजाला राजकीय आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा

गोवा विधानसभेत अनुसूचित जमाती (एसटी) समाजाला राजकीय आरक्षण देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने ‘गोवा विधानसभा अनुसूचित जमाती (एसटी) प्रतिनिधित्व अधिनियम, २०२५’ ची अधिसूचना जारी केली असून, हा कायदा ६ ऑगस्ट २०२६ पासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता विधानसभा मतदारसंघांच्या आरक्षणाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होणार आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार एसटी आरक्षण कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले.

संसदेतील मंजुरीनंतर अखेर अधिसूचना

केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक संसदेत मांडले होते. ५ ऑगस्ट २०२५ रोजी लोकसभेत आणि ११ ऑगस्ट २०२५ रोजी राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाले होते. मात्र, अधिसूचना जारी न झाल्याने त्याची अंमलबजावणी रखडली होती. अखेर अधिसूचना प्रसिद्ध झाल्याने कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

मतदारसंघ आरक्षणाची प्रक्रिया सुरू होणारजनगणना आयुक्तांकडून लोकसंख्येची माहिती निवडणूक आयोगाकडे पाठविल्यानंतर मतदारसंघ आरक्षणाचा प्राथमिक मसुदा जाहीर केला जाईल. हरकती आणि सूचना मागवून अंतिम आरक्षित मतदारसंघ निश्चित केले जाणार असून ही प्रक्रिया आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करावी लागणार आहे.
२०११ च्या जनगणनेवरून वादाची शक्यता

एसटी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सांगे, केपे, प्रियोळ आणि नुवे हे मतदारसंघ आरक्षित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांच्या माहितीनुसार, आगामी आरक्षण प्रक्रिया २०११ च्या जनगणनेच्या आधारे राबवली जाणार आहे. कोविड-१९ मुळे २०२१ ची जनगणना होऊ शकली नव्हती. नवीन जनगणना पूर्ण होण्यापूर्वीच विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपणार असल्याने २०११ च्या आकडेवारीच्या आधारे आरक्षण लागू करण्यास काही घटकांकडून हरकत घेतली जाण्याची शक्यता आहे.

अनेक वर्षांच्या संघर्षाला अखेर यश

एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर, आमदार गोविंद गावडे, 'उटा'चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांच्यासह विविध नेत्यांनी केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन अधिसूचना तातडीने जारी करण्याची मागणी केली होती. अखेर अधिसूचना जारी झाल्याने आरक्षणाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळणार आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?"एसटी आरक्षण कायद्याची अधिसूचना जारी झाल्याचे मी स्वागत करतो. हा कायदा लागू झाल्याने एसटी समाजासाठी मतदारसंघ आरक्षित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. आदिवासी बांधवांना न्याय मिळाला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मी आभार मानतो."

— डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
हेही वाचा
सर्व पहा