पणजी :भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) काही नामांकित मद्य ब्रँड्सच्या उत्पादनांवर कारवाई केल्यानंतर त्याचे पडसाद गोव्यातही उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर गोवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील मद्यनिर्मिती कारखान्यांची विशेष तपासणी मोहीम सुरू केली असून, अन्न सुरक्षा आणि लेबलिंग नियमांचे पालन होत आहे का, याची पडताळणी केली जात आहे.
नामांकित ब्रँड्सवर कारवाईनंतर हालचाल
ओल्ड मॉंक, मॅकडॉवेल्स, रॉयल चॅलेंज, इक्विटी ब्ल्यू आणि बॅगपायपर या काही नामांकित मद्य ब्रँड्सच्या विशिष्ट उत्पादनांमध्ये सुगंधी द्रव्यांचा वापर तसेच लेबलिंग नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत एफएसएसएआयने कारवाई केली होती. या पार्श्वभूमीवर देशभरातील मद्यनिर्मिती प्रक्रियेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
तपासणीत काही उत्पादकांनी रम आणि व्हिस्कीची चव व सुगंध वाढविण्यासाठी नैसर्गिक उत्पादन प्रक्रियेऐवजी कृत्रिम फ्लेवरिंग पदार्थांचा वापर केल्याचे आढळून आले. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये संबंधित उत्पादने अन्न सुरक्षा आणि मानक (मद्य व पेये) नियमांनुसार निकृष्ट दर्जाची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एफएसएसएआयने त्या उत्पादनांवर बंदी घालण्याचे आदेश दिले.
तपासणीदरम्यान मद्यनिर्मिती कारखान्यांमध्ये एफएसएसएआयने घालून दिलेल्या अन्न सुरक्षा मानकांचे तसेच उत्पादनांच्या लेबलिंगसंदर्भातील नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खात्री केली जात आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील मद्यनिर्मिती कारखान्यांची तपासणी सुरू झाली असून, ती पूर्ण झाल्यानंतर सविस्तर अहवाल जाहीर केला जाईल, अशी माहिती गोवा अन्न व औषध प्रशासनाच्या संचालक श्वेता देसाई यांनी दिली.


