
पणजी : ‘इनफ इज इनफ’च्या बैठकीची परवानगी ऐनवेळी मागे घेण्याच्या निर्णयाच्या विरोधात आज ‘इनफ इज इनफ’ची कोअर समिती बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीत आम्ही सभा ३० मे रोजीच घेणे, लोकभवनावर मोर्चा काढणे अथवा आझाद मैदानाबाहेर शांततापूर्ण आंदोलन करणे यातील एका पर्यायाचा विचार करत आहोत. याबाबतचा अंतिम निर्णय संध्याकाळपर्यंत कळवला जाणार असल्याची माहिती देविदास आमोणकर यांनी दिली.
बुधवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एल्विस गोम्स आणि गोविंद शिरोडकर उपस्थित होते. आमोणकर म्हणाले की, महापालिकेने २१ मे रोजी परवानगी दिल्यावर आम्ही पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य परवाने देखील घेतले होते. सभेच्या पूर्वतयारीचे नियोजन सुरू झाले होते. मात्र अचानक २५ मे रोजी महापालिकेने परवानगी मागे घेतली. ३० मे रोजी आझाद मैदान येथे घटक राज्य दिनानिमित्त प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याचे कारण महापालिकेने दिले आहे. महापालिकेला याबाबत अधिक माहिती नव्हती का, माहिती होती तर आम्हाला आधी परवानगी का दिली हे स्पष्ट करावे.
ते म्हणाले, ‘इनफ इज इनफ’ (Enough is enough) या चळवळीला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. चळवळीच्या लोकप्रियतेमुळे राज्य सरकार उघडे पडेल अशी भीती त्यांना वाटत आहे. या चळवळीला घाबरूनच सरकारने ऐनवेळी परवानगी मागे घेतली आहे. आम्ही सरकारच्या या कृतीचा निषेध करतो. गोव्यात आता पोर्तुगीज शासन नसले तरी सध्याचे सरकार पोर्तुगीजांप्रमाणेच हुकुमशाही पद्धतीने वागत आहे. परवाना मागे घेण्याची कृती पूर्णपणे लोकशाहीच्या विरोधात आहे.