
पणजी: मांडवी नदीत एका ऑफशोर कॅसिनोजवळ एक अज्ञात मृतदेह तरंगताना आढळल्याने बुधवारी सकाळी पणजीत मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, मांडवी नदीपात्रात उभ्या असलेल्या जहाजाजवळ हा मृतदेह तरंगत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच गोवा अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी १०:३१ वाजण्याच्या सुमारास नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती मिळाली होती. त्यानंतर पणजी अग्निशमन केंद्राचे जवान मदत व बचाव साहित्यासह तातडीने मांडवी नदीपात्रात दाखल झाले. रेस्क्यू टीमच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
सध्या अग्निशमन दलाने हा मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पणजी पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पणजी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बातमी अपडेट होत आहे.