देशाला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी पं. नेहरूंचे विचार आवश्यक : काँग्रेस

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
8 hours ago
देशाला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी पं. नेहरूंचे विचार आवश्यक : काँग्रेस

पणजी: पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रयत्नांमुळे देशातील शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक क्षेत्रांचा पाया घातला गेला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे देशाची प्रगती झाली. मात्र भाजप सरकारच्या मागील १२ वर्षांच्या काळात देशाची अधोगती होत आहे. देशाला पुन्हा प्रगतीपथावर न्यायचे असेल तर पं.नेहरूंचे विचार आवश्यक आहेत असे प्रतिपादन काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले.

नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त पणजीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पाटकर म्हणाले की, श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या नेहरूंनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. त्यांना अनेकदा तुरुंगात देखील जावे लागले. स्वातंत्र्य मिळाल्यावर नेहरू जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा देशात एक सुई सुद्धा तयार होत नव्हती. नेहरूंनी उद्योग व अन्य क्षेत्रांना चालना देणारे उपक्रम सुरू केले.  सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयु) स्थापन केले. आयआयएम, आयआयटी, एम्स सारख्या शिक्षण संस्था सुरू केल्या. ते एक दूरदर्शी नेतृत्व होते. मात्र आज भाजप सरकार एकापाठोपाठ एक पीएसयु विकत आहे. 

भाजप (BJP) सरकार देशाची मालमत्ता खाजगी कंपन्यांच्या घशात घालत आहे. भाजपचे मंत्री तसेच पंतप्रधान जनता अथवा पत्रकारांशी देखील संवाद साधत नाहीत. 

ते जनतेचे प्रश्न समस्या याबाबत गंभीर नाहीत. नेतृत्व शिक्षित नसेल तर देशाची अधोगती होते. अशा वेळी पंडित नेहरूंचे कार्य आपण लक्षात ठेवून त्यापासून प्रेरणा घेणे आवश्यक आहे. भाजप नेते सध्या देशातील कोणत्याही समस्येला नेहरूंना जबाबदार ठरवत आहेत. हे अत्यंत हास्यास्पद असून; भाजप नेत्यांनी आधी नेहरूंचे ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक वाचावे असे पाटकर म्हणाले.

हेही वाचा