हिट-अँड-रन प्रकरण; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी थार चालकाला अटक

मडगाव न्यायालयाने ठोठावली तीन दिवसांची पोलीस कोठडी.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
8 hours ago
हिट-अँड-रन प्रकरण; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी थार चालकाला अटक

मडगाव : मडगाव पोलिसांनी शिर्ली येथील ‘हिट अँड रन’ (Hit-and-Run) प्रकरणी महाराष्ट्रातील पुणे येथील स्वराज जगताप या 'रेंट-अ-कार' चालकाला अटक केली.  या घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी संशयितावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला. दरम्यान त्याला मडगाव न्यायालयात सादर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.   

राष्ट्रीय महामार्गावर शिर्ली परिसरात मंगळवारी ‘रेंट अ कार’ने दुचाकीस्वार महिलेला धडक देत पळ काढला होता. एका कारच्या कॅमेरातील फूटेजमधून ही घटना समोर आली. थार या ‘रेंट अ’ कारने भरधाव वेगाने येत चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करत असताना समोर जाणाऱ्या दुचाकीस्वार महिलेला धडक दिली. अपघात झाल्यानंतरही चालकाने गाडी न थांबवता त्याच वेगाने पुढे जात पळ काढला.

या घटनेची माहिती मडगाव पोलिसांना मिळताच तत्काळ सदर थार गाडीचा शोध सुरू करण्यात आला. मडगाव पोलिसांकडून वेर्णा, कुंकळळी, मायणा कुडतरी, फातोर्डा यासह कळंगुट भागातील पोलिसांनाही या घटनेची माहिती देत कारचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज (CCTV Footage) वरून गाडीची ओळख पटवून सदर गाडी चालवणाऱ्या पुणे येथील चालकाला कळंगुट येथून ताब्यात घेतले.

मडगाव पोलिसांनी चौकशीअंती संशयित स्वराज जगताप (१९, रा. पुणे) याला रीतसर अटक केली. संशयीत चालकाने चुकीच्या बाजूने वाहन चालवत दुचाकीला धडक दिली. त्याशिवाय अपघातानंतर वैद्यकीय सुविधा अपघातग्रस्त चालकाला मिळवून देण्यासाठी ही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान; जखमी दुचाकी स्वार महिलेवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. तिला शरीराच्या विविध भागावर फ्रॅक्चर्स असून; सध्या सर्जरी सुरू असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

हेही वाचा