प्रशासनाकडून पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप

म्हापसा : येथील श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवस्थळी (Shree Dev Bodgeshwar Jatrotsav) उभारलेल्या दोनपैकी हिंदू गटाकडे आवश्यक ना हरकत परवाने नसल्याने बार्देश देवालये प्रशासक (Bardesh Temple Administrator) कार्यालयाकडून संबंधित अॅम्युझमेंट पार्कला (Amusement park) लावलेले सील हटलेले नाही. या गटाने उपजिल्हाधिकारी व मामलेदारांची भेट घेऊन आपली कैफियत मांडत आपल्यावर होणाऱ्या अन्याय व पक्षपातीपणावर नाराजी व्यक्त केली.
यावेळी देवालये प्रशासक कार्यालयाकडून, हिंदू गटाच्या सदस्यांना सांगण्यात आले की, दुसऱ्या गटाने आवश्यक सर्व प्रमाणपत्रे सादर केली असून त्यांचे मनोरंजक राईड्सचे (अॅम्युझमेंट पार्क) सील हटविण्यात आले.
हिंदू गटाने आरोप केला की, प्रशासकीय अधिकारी जाणुनबुजून आम्हाला लक्ष्य करत आहेत. आम्ही मोठी आर्थिक गुंतवणूक करून जत्रोत्सवस्थळी मनोरंजक राईड्स उभारली आहेत. मात्र, अधिकाऱ्यांकडून आम्हाला परवानगी दिली जात नाही. आमच्याकडे इतर परवाने आहेत. परंतु, म्हापसा पालिका आणि देवस्थान समिती आम्हाला अर्ज करूनही एनओसी देत नाही.
दुसऱ्या गटाच्या मनोरंजक राईड्स आणि जायंट व्हीलला प्रशासकीय यंत्रणेचा पाठिंबा दिसतो. यामुळेच आम्हाला डावलले जात आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी संबंधित गटाच्या अॅम्युझमेंट पार्कचे सील हटविले गेले. यावरूनच प्रशासकीय कारभाराची कर्तव्यदक्षता दिसते. या गटाला रविवारी स्थितरता प्रमाणपत्र मिळाले. सुट्टीच्या दिवशी हे प्रमाणपत्र कसे मिळते आणि सील काढले जाते, असा सवाल उपस्थित करीत हिंदू गटाचे सुजन नाईक, विनोद वारखंडकर, सिद्धेश फळारी, विठ्ठल कोरगावकर, नारायण मयेकर, शुभम गोवेकर, संतोष आरोदेंकर यांनी नाराजी व्यक्त केली.