दोनापावला, म्हापशातील दरोड्यात साम्य

दोन्ही प्रकरणात एकाच टोळीचा सहभाग शक्य


08th October, 12:56 am
दोनापावला, म्हापशातील दरोड्यात साम्य

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : म्हापसा येथील डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावरील सशस्त्र दरोडा आणि दोनापावला येथील उद्योजक जयप्रकाश धेंपो यांच्या बंगल्यावर पडलेला दरोडा यांच्यात साम्य असल्याने दोन्ही प्रकरणात एकाच टोळीचा सहभाग असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. म्हापसा प्रकरणातील ६ दरोडेखोरांनी पणजीहून काळी-पिवळी टॅक्सी आणि खासगी एर्टिगा कारच्या मदतीने बेळगाव गाठले. टोळीतील दोघांनी गोव्यात येऊन रैकी करून महत्त्वाची माहिती गोळा केली आणि नंतर दरोडा घातल्याचा संशय पोलिसांना आहे. म्हापसा पोलिसांनी चार ते पाच पथके गोव्याबाहेर तपासासाठी पाठवली आहेत.
डाॅ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्याची दरोडेखोरांनी रैकी केली होती, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. दरोडेखोरांनी गणेशपुरीला पोहोचण्यासाठी लाल रंगाची कार वापरली होती. दरोडेखोरांनी जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर, डाॅ. घाणेकर यांचे मोबाईल आणि मारुती कार नेली. कार मंगळवारी पहाटे ५.४५ वा. पणजी कदंब बसस्थानकासमोर अटल सेतूखाली सापडली. सहा दरोडेखोरांनी पणजी येथून काळी-पिवळी टॅक्सी घेतली. टॅक्सी चालकाला बेळगावला पोहोचवण्यास सांगितले. गोव्याबाहेर जाण्यासाठी टॅक्सी चालकाने खोर्ली (तिसवाडी) येथून त्यांना खासगी एर्टिगा कार करून दिली. सकाळी ८.३० वा. बेळगाव बसस्थानकाजवळ त्यांना सोडून कार ११.३० वा. पणजीत पोहोचली. या माहितीवरून पोलिसांनी चार ते पाच पथके कर्नाटक, महाराष्ट्र व इतर राज्यांत रवाना केली आहेत.
दरम्यान म्हापसा आणि पाच महिन्यांपूर्वी दोनापावला येथील उद्योजक जयप्रकाश धेंपो याच्या बंगल्यावर पडलेल्या दरोड्यात साम्य असून त्यात एकाच टोळीचा सहभाग आहे. वरील प्रकरणात रैकी करणारे गोव्यात स्थायिक असण्याची किंवा एक-दोन दिवस गोव्यात आधी दाखल झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
गोव्यातील यापूर्वीचे दरोडे
प्रसिद्ध डाॅ. दीप भंडारी याच्या बंगल्यावर २००४ मध्ये दरोडा पडला होता. काही महिन्यानंतर पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले होते. मात्र त्यांच्याकडून चोरीस गेलेले दागिने आणि रोख रक्कम परत मिळवण्यात अपयश आले होते.
बांबोळी येथील गोमेकॉ कॉलनीत राहणारे डाॅ. उदय कुडाळकर यांच्या बंगल्यावर ६ ऑक्टोबर २०१८ रोजी दरोडा टाकून दागिने आणि रोख रक्कम मिळून सुमारे १६.५० लाख रुपये लुटले होते. त्यावेळी घरात कोणी नव्हते. या प्रकरणी आगशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण नंतर शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्याचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही.             

हेही वाचा