ज्येष्ठांच्या आधार कार्डसाठी विशेष कर्मचारी नियुक्त

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st July, 11:51 pm
ज्येष्ठांच्या आधार कार्डसाठी विशेष कर्मचारी नियुक्त

पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड सिडिंग करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सक्तीची केल्यानंतर, गोव्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी विशेष कर्मचारी नेमल्याची माहिती समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी विधानसभेत दिली.
याबाबत शून्य प्रहराच्या वेळी आमदार अालेक्स रेजिनाल्ड यांनी सभागृहात ज्येष्ठ नागरिकांची व्यथा मांडली. त्यांनी सांगितले की, ७० वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्तींना आधार सिडिंगसाठी बाहेर जाणे शक्य होत नाही. अनेक वेळा त्यांच्या बोटांचे ठसेही मशीनवर व्यवस्थित घेतले जात नाहीत. त्यामुळे त्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. यासाठी आधार सिडिंगची सक्ती मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली..........कोट........
आधार सिडिंग हे केंद्र सरकारने सक्तीचे केले आहे, त्यामुळे ते रद्द करणे शक्य नाही. ७० वर्षांवरील नागरिकांना यामध्ये त्रास होतो याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना घरपोच आधार सिडिंग सेवा देण्यासाठी खास फिल्म कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. - सुभाष फळदेसाई, समाजकल्याण मंत्री