खंडणी, धमकी दिल्याचा आरोप : पर्वरी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : एक वर्षाहून अधिक काळ फरार सराईत गुन्हेगार टारझन पार्सेकर आणि सागर ऊर्फ क्षेत्रपाल पाटील यांच्या मुसक्या आवळण्यात पर्वरी पोलिसांना यश आले. पर्वरी पोलिसांनी पेडणे पोलिसांच्या मदतीने बांधकाम व्यावसायिकाला धमकी देऊन खंडणी मागितल्या प्रकरणी वरील दोघांसह सनीश घाटवळ यालाही अटक केली.
या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, ९ जून रोजी पिळर्ण-पर्वरी मार्गावर तक्रारदाराची गाडी टारझन पार्सेकर व इतरांनी अडवली. त्याला धमकी देऊन महिन्याला १ लाख रुपये खंडणी देण्यास सांगितले. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी टारझन पार्सेकर, सागर पाटील व इतरांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आठ दिवस पोलीस त्यांच्या मागावर होते. या काळात पोलिसांनी पार्सेकरने वापरलेली कार जप्त केली. संशयितांनी कर्नाटक, महाराष्ट्रात पलायन केले.
शनिवारी टारझन पार्सेकर आणि त्याचे साथीदार उत्तर गोव्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल परब यांच्या नेतृत्वाखालील उपनिरीक्षक मंदार परब, सीताराम मळिक, सचिन शिरोडकर, प्रतीक तुळसकर, आकाश चोडणकर, अरुण शिरोडकर, हवालदार विनय श्रीवास्तव, काॅन्स्टेबल महादेव नाईक, नीतेश गावडे, आकाश नावेलकर, सिद्धेश नाईक, देविदास मालकर, हेमंत गावकर व इतरांचे पथक तयार करून संशयितांचा शोध सुरू केला. संशयित पेडणे परिसरात असल्याचे समजताच पेडणे पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. निरीक्षक सचिन लोकरे, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, साहील नाईक, प्रथमेश पार्सेकर, तुकाराम चोडणकर, काॅ. सागर खोर्जुवेकर, चेतन सावंत, हेमंत सावंत, रूपेश शिवाजी, सचिन गावस, कृष्णा वेळीप व इतरांचे पथक तयार करून पेडणे तालुक्यातील चार सीमांवर नाकाबंदी केली. पेडणे परिसरात गस्त वाढवली. पोलीस मागावर असल्याचा सुगावा टारझनला लागला; परंतु त्याला गोव्याची सीमा ओलांडता आली नाही. संशयित नईबाग परिसरात असल्याचे समोर आले. पोलिसांनी टारझन पार्सेकर, सागर पाटील यांच्यासह चाैघांना एका घरातून ताब्यात घेतले. त्यांना पर्वरी पोलीस स्थानकात आणल्यानंतर पोलिसांनी टारझन पार्सेकर, सागर पाटील व सनीश घाटवळ यांना अटक केली.
संशयितांनी कर्नाटक, महाराष्ट्रात घेतला आश्रय
टारझन पार्सेकर आणि सागर पाटील यांना बाल न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर ते फरार झाले होते. हणजूण पोलिसांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाला ते फरार झाल्याची माहिती दिली होती. दोघांचा जामीन १२ मार्च २०२४ रोजी न्यायालयाने रद्द केला. याच दरम्यान ते खंडणी व इतर गुन्ह्यांत सहभागी झाले होते. ते कर्नाटकात आणि महाराष्ट्रात लपून राहत होते, अशी माहिती मिळाली आहे.
घरमालकावर होणार कारवाई
पोलिसांनी संशयितांना एका घरातून ताब्यात घेतले. शनिवारची रात्र ते त्याच घरात होते. हे घर नईबाग परिसरात जुगार अड्डा चालविणाऱ्या व्यक्तीचे आहे. फरार संशयितांना आश्रय दिल्याबद्दल पर्वरी पोलीस त्या घरमालकावर कारवाई करणार अाहेत.