गोविंंद गावडे यांचे आज माशेल येथे शक्तिप्रदर्शन

मंत्रिपद गेल्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक : भविष्यातील भूमिकेवर चर्चा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd June, 12:45 am
गोविंंद गावडे यांचे आज माशेल येथे शक्तिप्रदर्शन

पणजी : मंत्रिपद गमावल्यानंतर आमदार गोविंद गावडे यांनी रविवार, २३ जून रोजी दुपारी ४ वाजता माशेल येथील सभागृहात प्रियोळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते आपली भूमिका आणि भविष्यातील वाटचालीवर चर्चा करणार असून, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोविंद गावडे यांनी २०१७ मध्ये प्रियोळमधून अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांनी भाजपला पाठिंबा देत मनोहर पर्रीकर आणि नंतर डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले. गेल्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत प्रियोळमधून पुन्हा निवडणूक लढवली आणि आमदार झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले.
गेल्या काही काळापासून कला अकादमीच्या नूतनीकरणासह काही विधानांमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. फोंड्यातील एका कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडील आदिवासी कल्याण खात्यावर टीका केली होती, त्यानंतर त्यांचे मंत्रिपद अडचणीत आले. गोवा क्रांतीदिनी (१८ जून) त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याचा आदेश देण्यात आला. आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचे असभ्य वर्तन सहन केले जाणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी गावडे यांच्या हकालपट्टीनंतर स्पष्ट केले होते.दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर सुरुवातीला नीलेश काब्राल यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आणि आता जवळपास अडीच वर्षांनंतर गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटवण्यात आले आहे. त्यामुळे रविवारच्या बैठकीत गोविंद गावडे नेमके काय बोलणार आहेत आणि त्यांच्या सभेला किती लोकांची उपस्थिती राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गावडे यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष
मंत्रिपदावरून काढून टाकल्यानंतर गावडे यांनी अद्याप पक्ष किंवा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप केले नसले, तरी त्यांची नाराजी उघड झाली आहे. माशेलमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित असताना, आमदार म्हणून निमंत्रण असूनही गावडे अनुपस्थित राहिले होते. गावडे हे अनुसूचित जमातीचे (एसटी) महत्त्वाचे नेते असल्याने, रविवारच्या बैठकीला त्यांच्या कार्यकर्त्यांसह गावडा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.