हस्तकला महामंडळाचा उपक्रम : स्थानिक कलाकारांना मिळणार जागतिक व्यासपीठ
पणजी : राज्यातील पारंपरिक हस्तकला कलाकारांनी बनवलेल्या विविध वस्तू आता ऑनलाईन स्वरूपात खरेदी करता येणार आहेत. यासाठी गोवा हस्तकला, ग्रामीण आणि लघुउद्योग महामंडळातर्फे लवकरच संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे कुणबी साडीसह कारागिरी केलेल्या बांबू, माती, लाकूड, कपडे, काच, नारळाच्या वस्तू उपलब्ध असणार आहेत. पुढील दोन महिन्यांत हे संकेतस्थळ सुरू होणार आहे. याद्वारे स्थानिक हस्तकलाकारांना प्रोत्साहन मिळणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय गावडे यांनी दिली.
गावडे यांनी सांगितले की, गोव्यातील कलाकार पारंपरिक हस्तकलेतून विविध वस्तू बनवतात. गेली अनेक वर्षे ही परंपरा सुरू आहे. मात्र, वस्तूंना म्हणावी तशी बाजारपेठ मिळत नाही. अनेकांना तर गोव्यात एवढ्या सुंदर कारागिरी असलेल्या वस्तू बनतात हेच माहीत नसते. गोव्यात दरवर्षी लाखो पर्यटक येतात. अनेक जण किनारी भागातून हस्तकलेच्या वस्तू खरेदी करतात. मात्र, अनेकदा या वस्तू स्थानिक कलाकारांनी बनवलेल्या नसतात. गोव्याची हस्तकला म्हणून दुसऱ्या राज्यात तयार केलेल्या वस्तू खपवण्याचे प्रकारही घडत आहेत. यामुळे स्थानिक कलाकारांवर एक प्रकारे अन्याय होतो.
या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही महामंडळाच्या संकेतस्थळावरून स्थानिक हस्तकलाकारांनी बनवलेल्या वस्तू विकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सुमारे २०० कलाकारांना या संकेतस्थळाचा फायदा होणार आहे. वस्तू ऑनलाईन खरेदी केल्यावर ती गोव्यात अथवा गोव्याबाहेर देखील पोहोच करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच आम्ही डिलिव्हरी पार्टनर नेमणार आहोत. संकेतस्थळामुळे स्थानिक हस्तकलाकारांना फायदा तर होणार आहे. तसेच अस्सल गोमंतकीय वस्तूंचीच विक्री होऊन संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होणार असल्याचे डॉ. गावडे यांनी सांगितले.
याशिवाय महामंडळाच्या पणजी, कळंगुट, वास्को मडगाव येथील दुकानांत पारंपरिक हस्तकलाकारांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीस ठेवण्यात आलेल्या आहेत. ग्राहकांना चांगला अनुभव मिळावा यादृष्टीने ही दुकाने विकसित केली जात आहे. पूर्वी हस्तकलाकारांना त्यांच्या मालाच्या विक्रीचे पैसे उशिराने मिळत होते. यामध्येही आम्ही बदल केला आहे. आता त्यांना विविध रक्कम तत्काळ दिली जात आहे. महामंडळातर्फे कलाकारांना विविध प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी देखील मदत केली जात असल्याचे डॉ गावडे यांनी सांगितले.
कुणबी व्हिलेज वर्षअखेरीस होणार सुरू
डॉ. गावडे यांनी सांगितले की, सांगे येथील कुणबी व्हिलेजचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे. असे झाल्यास कुणबी व्हिलेज वर्षअखेरीस सर्वांसाठी खुले होणार आहे. याशिवाय मळा येथे महामंडळाची 'गोवा हात' ही इमारत पुढील दीड वर्षात पूर्ण होणार आहे.