दबाव झुगारला; गावडेंना मंत्रिमंडळातून डच्चू

गोविंद गावडेंकडून बंडाचे संकेत; आदिवासी कल्याण खात्यावरील आरोप भोवले


18th June, 11:50 pm
दबाव झुगारला; गावडेंना मंत्रिमंडळातून डच्चू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केलेल्या गोविंद गावडे यांना अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपने बुधवारी मंत्रिमंडळातून डच्चू देत, ‘उटा’ संघटनेचा दबावही​ झुगारून दिला. मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर गावडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टपणे बंडाचे संकेत दिले आहेत.
कला अकादमीच्या नूतनीकरणात भ्रष्टाचार झाल्याचा दावा करून विरोधकांनी काही वर्षांपासून गोविंद गावडे यांच्याविरोधात राज्यभर रान पेटवले होते. अशा स्थितीतच गावडे यांनी काहीच दिवसांपूर्वी फोंडा येथे एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडील आदिवासी कल्याण खात्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला होता. पणजीतील श्रमशक्ती भवनच्या खाली कंत्राटदारांकडून ‘घेवाण देवाण’ देऊन फायली वरपर्यंत पोहोचवल्या जातात, असे म्हणत त्यांनी या खात्यात भ्रष्टाचार होत असल्याचे स्पष्ट केले होते. गावडे यांच्या या वक्तव्यांनंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांना, तर विरोधी आमदारांनी सरकारला लक्ष्य केले. हा वाद अनेक दिवस कायम राहिला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पक्षशिस्तीचा भंग केल्याच्या कारणावरून गोविंद गावडे यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असे संकेत दिले होते. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी हा विषय पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवला होता. त्यामुळे केंद्रीय पातळीवर याबाबत हालचालीही सुरू होत्या. अखेर बुधवारी पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवून मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि भाजपने त्यांना मंत्रिमंडळातून हटवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत प्रियोळमधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या गोविंद गावडेंना सरकारमध्ये घेऊन भाजपने त्यांना मंत्री बनवले. त्यानंतर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत गावडे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी भाजपने त्यांना प्रियोळची उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणले आणि सलग दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात स्थान दिले. मंत्रिपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात आदिवासी समाजाचे नेते असतानाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे आदिवासी कल्याण खात्याचा कारभार न देता तो स्वत:कडेच ठेवला. त्याचाच राग गावडे यांनी ‘प्रेरणा दिन’ कार्यक्रमात काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आता लक्ष ‘उटा’च्या भूमिकेकडे
गोविंद गावडेंनी प्रेरणा दिन कार्यक्रमात आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर टीका केल्यानंतर त्यांचे मंत्रिपद जाण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर ‘उटा’ संघटना अधिक आक्रमक झाली.
गावडे यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यावर नव्हते, तर ते आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून हटवू नये. तसे झाल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा ‘उटा’च्या नेत्यांनी फर्मागुडीत सभा घेऊन दिला होता.
त्याचवेळी आदिवासी समाजाची महत्त्वाची संघटना असलेल्या ‘गाकुवेध’ने गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळल्यास त्यांच्याजागी आदिवासी समाजातील इतर नेत्याची वर्णी लावावी, अशी मागणी केली. त्यामुळे गावडेंनी निर्माण केलेल्या वादानंतर आदिवासी समाजात उभी फूट पडल्याचे समोर आले होते.
‘उटा’चा दबाव स्वीकारून मुख्यमंत्री आणि भाजप गावडेंना मंत्रिपदी कायम ठेवेल, असे संघटनेच्या नेत्यांना वाटत होते; पण त्यांचा दबाव झुगारून देऊन मुख्यमंत्री आणि भाजपने गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री आणि पक्षीय पातळीवर प्रयत्न करूनही गावडेंना मंत्रिमंडळातून वगळल्याने ‘उटा’ काय भूमिका घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.


निर्णय पक्ष वाढीसाठी : दामू नाईक
गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पक्षाने समन्वयाने घेतला आहे. आम्हाला कुणाशी मित्रत्व आणि शत्रुत्वही नको आहे. आम्ही राज्यात पक्ष वाढीसाठी काम करत आहोत. पुढील आठ दिवसांत राजकीयदृष्ट्या अनेक निर्णय घेतले जातील, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी बुधवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
गावडेंकडून बंडखोरीचे संकेत
मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर गोविंद गावडे यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त करून बंडखोरीचे स्पष्ट शब्दांत संकेत दिले. ‘दबलेल्या लोकांची बाजू घेतली याची पावती क्रांतीदिनी मिळाली, हे माझे भाग्यच आहे. सरकारने ज्या गोष्टीसाठी भूमिका घेतली त्या संघर्षाचा आवाज होण्याची ही संधी आपल्याला मिळाली आहे’, असे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
रमेश तवडकर की गणेश गावकर ?
गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून हटवल्यानंतर त्यांच्या जागी कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘गाकुवेध’च्या मागणीनुसार गावडेंच्या आदिवासी समाजाचे नेते असलेल्या सभापती रमेश तवडकर किंवा गणेश गावकर यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे.
आणखी दोन मंत्र्यांना हटवण्याची शक्यता
राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाचा विषय अडीच वर्षांपासून गाजत आहे. गावडेंना हटवल्याची संधी साधून दोन दिवसांत आणखी दोन मंत्र्यांना डच्चू देत, आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो आणि संकल्प आमोणकर या तीन आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा विचार भाजपकडून सुरू आहे. शनिवारी, २१ जून रोजी त्यांचा शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.   

         

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे मायकलच्या सहभागाबाबत चर्चा
आमदार मायकल लोबो यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोबोंच्या कर्तुत्वाचे कौतुक केले. लोबो यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे. भाजपातून बाहेर जाऊन ते पुन्हा पक्षात आले. त्यानंतरही त्यांनी पक्षात राहून चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे पुढील काळात त्यांना आणखी चांगले दिवस येतील, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे मायकल लोबोंचा मंत्रिमंडळात समावेश होण्यासंदर्भातील चर्चांनी जोर धरला आहे.