‘डिजिटल अरेस्ट’द्वारे मडगावातील महिलेला २.६० कोटी रुपयांचा गंडा

गुन्हा दाखल; सायबर विभागाकडून तपास सुरू


19th June, 05:35 am
‘डिजिटल अरेस्ट’द्वारे मडगावातील महिलेला २.६० कोटी रुपयांचा गंडा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पोलीस व केंद्र सरकारकडून ‘डिजिटल अरेस्ट’बाबत जागृती केली जात आहे. तरीही याच प्रकाराने लाखो रुपयांना गंडा घातला जात असल्याची प्रकरणे घडतच आहेत. नुकतेच मडगाव येथील एका महिलेला टेलीफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) आणि सीबीआयचा अधिकारी असल्याचे भासवून तब्बल २.६० कोटींचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी सायबर विभागाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी आके-मडगाव येथील एका महिलेने ९ जून रोजी सायबर विभागात तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी अज्ञात तीन मोबाईलधारकांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (३) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ डी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अशी झाली फसवणूक...
२० मे ते २ जून २०२५ दरम्यान अज्ञात व्यक्तीने ‘ट्राय’चा अधिकारी असल्याचे भासवून संपर्क केला.
तक्रारदाराच्या आधार कार्डद्वारे मनी लाँड्रिंगचे व्यवहार झाल्याचे त्याने सांगितले.
दुसऱ्या व्यक्तीने मुंबई येथील केंद्रीय सीबीआयचा अधिकारी असल्याचे भासवून संपर्क केला.
त्या व्यक्तीने तिला सर्वोच्च न्यायालयाचे बनावट वाॅरन्ट पाठविले.
प्रकरण मिटविण्यासाठी विविध बँक खात्यांत पैसे जमा करण्यास सांगितले.
तक्रारदार महिलेने २ कोटी ६० लाख ३३ हजार ६३४ रुपये विविध बँक खात्यांत जमा केले.