कसोटी कर्णधारपदाची ऑफर मीच नाकारली

वेगवान गोलंदाज बुमराहचा खुलासा

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
18th June, 12:01 am
कसोटी कर्णधारपदाची ऑफर मीच नाकारली

नवी दिल्ली : भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अखेर कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून सुरू असलेल्या चर्चांवर मौन सोडले आहे. आयपीएलदरम्यान कसोटी कर्णधार बनण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) ऑफर आपणच नाकारली, असा धक्कादायक खुलासा बुमराहने केला आहे.

बुमराहने या निर्णयामागे कार्यभाराचे व्यवस्थापन आणि दीर्घकाळ क्रिकेट खेळण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचे म्हटले आहे. मी कार्यभाराचे व्यवस्थापन करत आहे आणि दीर्घकाळ खेळण्यासाठी मला अधिक समजूतदार होण्याची गरज आहे, असे बुमराह म्हणाला. गेल्या काही वर्षांपासून बुमराहला दुखापतींच्या समस्यांनी ग्रासले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या सामन्यातून त्याला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले होते. याच दुखापतीमुळे बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग बनू शकला नाही, जी भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकली.

बुमराहने सांगितले की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयला त्याने भारतीय संघाची कमान सांभाळावी अशी इच्छा होती. मात्र, पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुढे जाण्यासाठी कार्यभारावर चर्चा केल्याचे बुमराहने स्पष्ट केले. त्यानंतर बीसीसीआयला फोन करून त्याने सांगितले की मला कर्णधाराच्या भूमिकेत पाहायला नको, कारण मी सर्व कसोटी सामने खेळू शकणार नाही. बुमराहच्या या स्पष्टीकरणामुळे त्याच्या कसोटी कर्णधारपदावरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

शुभमन गिलकडे संघाची धुरा

रोहितच्या निवृत्तीनंतर संघाची कमान कोणाकडे सोपवायची यावर बरीच चर्चा सुरू होती. बीसीसीआयने मला कर्णधार पदासाठी विचारले होते. पण, मी ही ऑफर नाकारल्याचे त्याने स्पष्ट केले.  कारण कोणीतरी तीन कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व करावे आणि नंतर दुसऱ्या कुणाला उर्वरित सामन्यांमध्ये कर्णधार करावे हे आदर्श नाही. संघाच्या हिताला प्राधान्य देत मी सर्व सामने खेळू शकणार नसल्याने हे पद नाकारले.  त्यानंतर मुख्य निवडकर्ता अजित अगरकर यांनी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करताना शुभमनला भारताचा पुढील कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त केले.