बंगळुरू : तमिळ सुपरस्टार कमल हासन सध्या आपल्या एका विधानामुळे प्रचंड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ‘कन्नड भाषा ही तमिळमधूनच उदयास आली आहे’ असे वक्तव्य त्यांनी चेन्नईत त्यांच्या आगामी ‘ठग लाईफ’ चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमात केल्यावर त्यांच्यावर कर्नाटकात जोरदार टीका होत आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या प्रतिमा जाळण्यात आल्या असून, कर्नाटकात चित्रपट प्रदर्शनावरही बंदी घालण्यात आली आहे.
कमल हासन यांनी हे विधान अभिनेता शिवराजकुमारच्या भाषणानंतर केले. त्यांनी कन्नड आणि तमिळ संस्कृतीतील समानतेवर भर देत ही भूमिका मांडली होती. मात्र, प्रो-कन्नड संघटनांनी हे विधान कन्नड भाषेचा अपमान मानून विरोध सुरु केला. काही संघटनांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली, तर अनेक नामवंत कन्नड व्यक्तींनीही कमल हासन यांच्याकडून माफीची मागणी केली. मात्र, कमल हासन यांनी स्पष्टपणे माफी मागण्यास नकार दिला आहे.
या वादात २ जून रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टाने कमल हासन यांच्यावर जनभावना दुखावल्याचा आरोप करत, त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आणि कर्नाटकात ‘ठग लाईफ’च्या प्रदर्शनावर बंदी घातली. न्यायालयाने म्हटले की, राज्यांचे भाषेच्या आधारावर विभाजन झाले असून अशा संवेदनशील विषयांवर भाष्य करताना जबाबदारीने बोलणे आवश्यक आहे. तुम्ही असाल 'उलगनायकन' कमल हासन पण, समाजात तेढ निर्माण करण्याचा तुम्हाला अधिकार नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
कमल हासन हे १९ फिल्मफेअर, ४ राष्ट्रीय पुरस्कार तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या सन्मानांनी गौरवले गेलेले अभिनेते आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत चाइल्ड आर्टिस्टपासून ते चित्रपट दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास केला आहे. मात्र, त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला आता भाषिक राजकारणाची झळ बसू लागली आहे.
‘ठग लाईफ’ हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, कर्नाटकात विरोध आणि न्यायालयीन बंदीमुळे चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आता चित्रपट प्रदर्शनासाठी कमल हासन यांना आपली भूमिका सौम्य करावी लागते की विरोध अधिक तीव्र होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.