हाणामारीसाठी बाऊन्सरांचा वापर करण्याचे प्रकार आता सत्तरीतही

नागवे येथे सरकारी जमिनीच्या मालकीसाठी वाद; तिघांवर गुन्हा


16th February, 11:22 pm
हाणामारीसाठी बाऊन्सरांचा वापर करण्याचे प्रकार आता सत्तरीतही

(संग्रहित छायाचित्र)

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई : संबंधित खात्याच्या दुर्लक्षामुळे नागवे येथील सरकारी जमिनीवर डल्ला मारण्याचे प्रकार सुरूच आहेत. दोन दिवसांपूर्वी सरकारी जमिनीच्या मालकीवरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. हाणामारी आणि महिलेची छेड काढल्याबद्दल वाळपई पोलिसांनी तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हाणामारीवेळी बाउन्सरांचा वापर झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
नागवे-सत्तरी येथील सर्वे क्रमांक १०/२ येथे सुमारे ८५ हजार चौ.मी. सरकारी जमीन आहे. त्या जमिनीवर काही कब्जेदारांची नावे लागली आहेत. काही कब्जेदारांनी तर काही जमीन बेकायदेशीररीत्या प्लाॅट तयार करून विकलीही आहे. एकच जमीन अनेकांना विकल्यामुळे दोन दिवसांपूर्वी वादावादी झाली होती. रिटा मास्कारेन्हास यांनी आपल्या जमिनीत बेकायदेशीररीत्या संरक्षण कुंपण घातले जात असल्याबद्दल हरकत घेतली होती. यावेळी रिटा मास्कारेन्हास व बिलाल नामक बाऊन्सर, झहीर खान, शबनम खान, शाहीद खान यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी बिलाल नामक बाउन्सरने रिटा यांची छेड काढल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत म्हटले आहे. बिलाल नामक बाउन्सरने दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला व संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
परप्रांतीयांचा वाढता लोंढा धोकादायक
गेल्या काही वर्षांपासून या भागात परप्रांतीय वाढले आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या वस्त्या निर्माण झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी येथून अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूूर्वी पंचायतीने सजग व्हावे व परप्रांतीयांच्या घरांना क्रमांक देऊ नयेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गैरप्रकारांकडे प्रशासनाची डोळेझाक
वाळपई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर जमीन सरकारच्या मालकीची आहे. बेकायदेशीरपणे प्लाॅट करून जमीन विकण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत. या संदर्भात संबंधित प्रशासकीय खात्याने अाजपावेतो लक्ष दिलेले नाही. संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन हे गैरप्रकार थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.