प्रतिनिधी | गोवन वार्ता
पणजी : नुकतेच भारतीय मत्स्य सर्वेक्षण (एफएसआय) संस्थेने अरबी समुद्रात खोल मासेमारीसाठी कमी वापर झालेल्या तसेच वापर न झालेल्या क्षेत्रांचा शोध लावला आहे. देशाच्या पश्चिम किनाऱ्यापासून सुमारे १०० ते १२० नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या या नवीन जागांवर तासाला सरासरी १५० ते ३०० किलो कॅच पर युनिट ए फर्ट (सीपीयुई) मासे पकडण्यात आले. यामध्ये केरळमधील कोल्लम ते गोव्यापर्यंतच्या अरबी समुद्रातील जागांचा समावेश आहे.
एफएसआयतर्फे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना योजनेद्वारे मिळालेल्या निधीतून ही मोहीम राबविण्यात आली होती. एफएसआयने ट्रॉलरद्वारे हे सर्वेक्षण केले. सर्वेक्षण करणारी ही बोट किनाऱ्यापासून ३०० ते ५४० मीटर खोल समुद्रात दिवसरात्र कार्यरत होती. सर्वेक्षणात दिवसा आणि रात्रीच्यावेळी केलेल्या मासेमारीत सापडलेल्या माश्यांचे प्रमाण किंवा माशांच्या प्रजातींच्या विविधतेत कोणताही महत्त्वपूर्ण फरक आढळला नाही. संस्थेतर्फे यापुढेही अशा प्रकारच्या मोहिमा हाती घेतल्या जाणार आहेत.
अति मासेमारी, हवामान बदल या पार्श्वभूमीवर हा शोध अत्यंत महत्त्वाचा असल्याचे संस्थेचे महासंचालक डॉ. श्रीनाथ के. आर. यांनी सांगितले. विभागीय संचालक डॉ. एस. रामचंद्रन यांनी मत्स्यव्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी खोल समुद्रातील संसाधने उपयुक्त असल्याचे सांगितले. मोहिमेत डॉ. नशाद एम, शिवा ए, आशिक पी, वेंकटेश सरोज, जोसेफ इग्नेशियस डॉ. एच. डी. प्रदीप, डॉ. एम. के. सिन्हा आणि राजू एस. नागपुरे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
सर्व्हेक्षणात आढळले हे मासे
मोहिमेत हंपबॅक, नायलॉन कोळंबी, अरेबियन रेड कोळंबी, स्पाईनी कोळंबी, काटेरी लॉबस्टर, स्क्वॅट लॉबस्टर, फ्रॉगहेड ईल, रोझी कॉड, सॅकफिश, स्नेक मॅकरेल, रॉयल एस्कॉलर, मायक्टिओफिड्स, बँडफिश, डकबिल फ्लॅटहेड, स्प्लेंडिड अल्फोन्सिनो, शॅडो ड्रिफ्टफिश, स्पायनीजॉ ग्रीनआय, शॉर्टफिनि ओस्कोप्लिड, स्टार गेझर्स ,सिकलेफिन चिमेरा, पिग्मी रिबनटेल कॅटशार्क, ब्रॅम्बल शार्क, इंडियन स्वेलशार्क त्रावणकोर स्केट यासारख्या मासे आढळून आले.