पॅरा-अॅथलीट साक्षी काळेला मये मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक

वेदांता सेसा गोवाकडून आयोजन : विविध गटांत चुरशीची स्पर्धा

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th February, 09:20 pm
पॅरा-अॅथलीट साक्षी काळेला मये मॅरेथॉनमध्ये प्रथम क्रमांक

पणजी : प्रतिष्ठित पॅरा-अॅथलीट आणि ‘आयर्न लेडी’ साक्षी काळे हिने मये मॅरेथॉनमध्ये ५ किलोमीटरच्या सर्वसाधारण गटात प्रथम क्रमांक पटकावला. तिचा अनुकरणीय दृढनिश्चय आणि कामगिरी सर्व उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली. एकूण २०+ दिव्यांग खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला.

वेदांता आयर्न ओर गोवाने (आयओजी) ‘यु द चेंज, यु द पावर’ उपक्रमांतर्गत युवा सबलीकरण आणि समुदाय विकासाच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, ‘मये मॅरेथॉन’च्या तिसऱ्या आवृत्तीसाठी श्री महामाया हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेशी भागीदारी केली.

यंदा मॅरेथॉनसाठी १ हजार ५०० पेक्षा अधिक नोंदणी झाली होती, जी या स्पर्धेसाठी आतापर्यंतची सर्वोच्च आहे. सहभागींनी २१ किमी, १० किमी, ५ किमी, आणि ३ किमी यासह विविध विभागांमध्ये स्पर्धेत भाग घेतला, तसेच सर्व वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र श्रेणी होती. या कार्यक्रमात विविध विभागात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली.

२१ किमी गटात सिद्धेश बार्जे विजयी

सिद्धेश बार्जे आणि नंदेश गावकर यांनी २१ किमी गटात प्रथम आणि उपविजेतेपद पटकावले. १० किमी गटात हरी वेळीप आणि अयान सुआरीस अनुक्रमे मुले आणि मुलींच्या गटात विजयी झाले. परशुराम घडे ५ किमी गटात विजयी झाला. ४५ हून अधिक विभागांमध्ये संजय केळकर, सुरेश मुरगावकर आणि द्राक्षयनी मुरगोड अनुक्रमे २१ किमी, १० किमी गटात विजयी झाले.

सर्व वयोगटाचा सहभाग प्रेरणादायी : प्रेमेंद्र शेट

या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले, की, मये मॅरेथॉन ३.० सारखे कार्यक्रम फिटनेस, सर्वसमावेशकता आणि सामुदायिक भावनेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सर्व वयोगटातील लोकांचा असा उत्साही सहभाग पाहणे, हे प्रेरणादायी आहे. वेदांता आयर्न ओर गोवा आणि श्री महामाया हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेने निरोगी आरोग्याची संस्कृती वाढवण्यासाठी केलेले हे प्रयत्न कौतुकास पात्र आहेत, असे प्रेमेंद्र शेट म्हणाले.

मॅरेथॉनच्या बक्षीस वितरण समारंभात मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी, वेदांता आयओजी धीरजकुमार जगदीश, सरपंच मये वायंगीणी कृष्णा चोडणकर आणि पंच सदस्य, ग्रामपंचायत, मये वायंगीणी विशांत पेडणेकर व वेदांता सेसा गोवाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.