म्हापसा ड्रीम क्रशर्सचा पराभव : सनत म्हापणे ठरला सामनावीर
मडगाव : आल्कॉन जीएसबी युनिटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत विद्युतझाेतात झालेल्या सामन्यात सिंक रेंजर्स यूसीने म्हापसा ड्रीम क्रशर्सचा ३ गडी राखून पराभव केला. गोवा जीएसबी स्पोर्टस् अँड चॅरिटेबल ट्रस्ट यांनी गोवा सारस्वत समाज यांच्या सहकार्याने मडगाव येथील एमसीसी मैदानावर या स्पर्धेतील सामने होत आहेत.
म्हापसा ड्रीम क्रशर्सने १९.३ षटकांत सर्वबाद १४६ धावा केल्या. यानंतर सिंक रेंजर्सने १९ षटकांत ७ गडी गमावून १४७ धावा करत विजय संपादन केला. सलग तीन पराभवांनंतर सिंक रेंजर्स यूसीचा हा या स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला.
सिंक रेंजर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. म्हापसा ड्रीम क्रशर्सची ३ बाद १७ अशी नाजुक स्थिती झाली होती. यानंतर नील नेत्रावळकर (१८), नित्यय कुंकळ्येकर (३६), विपुल देशप्रभू (३५), मेहांक धारवाडकर (२०) यांनी संघाच्या डावाला उभारी दिली. तळातील फलंदाजांच्या अपयशामुळे ड्रीम क्रशर्सला पूर्ण षटके फलंदाजी करता आली नाही. सिंक रेंजर्सकडून मेघ नेत्रावळकर, अनीश काकोडे व सनत म्हापणे यांनी प्रत्येकी २ तर तुनीश सावकार व वर्धन मिस्किन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना सिंक रेंजर्सला साईराज धोंड (३५) व साहील अडवलपालकर (३५) यांनी ७० धावांची खणखणीत सलामी दिली. वर्धन प्रभू मिस्किनने नाबाद ३३ तर सनत म्हापणे याने २४ धावा केल्या. सनत म्हापणे याला सामनावीराचा पुरस्कार लाभला.
संक्षिप्त धावफलक
म्हापसा ड्रीम क्रशर्स : १९.३ षटकांत सर्वबाद १४६ (नित्यय कुंकळ्येकर ३६, विपुल देशप्रभू ३५, मेहांक धारवाडकर २०, नील नेत्रावळकर १८, मेघ नेत्रावळकर १०-२, अनीश काकोडे १९-२, सनत म्हापणे २६-२, तुनीश सावकार १५-१, वर्धन प्रभू मिस्किन ३२-१) पराभूत वि. सिंक रेंजर्स यूसी : १९ षटकांत ७ बाद १४७ (साईराज धोंड ३५, साहील अडवलपालकर ३५, वर्धन प्रभू मिस्किन नाबाद ३३, सनत म्हापणे २४, मेहांक धारवाडकर २४-२, सोमय नाईक १८-१, महेश चुरी २७-१, विपुल देशप्रभू २२-१).