आज पहाटेची घटना
पणजी : दिवाडी येथील फेरी धक्क्यावरून आज शनिवारी ११ जानेवारी रोजी पहाटे ३च्या सुमारास कार पाण्यात गेली. दरम्यान झाला प्रकार लक्षात येताच येथे बाजूलाच उपस्थित असलेल्या फेरीबोटमधील कर्मचाऱ्यांनी लाईफ जॅकेट व रेस्क्यू ट्यूब पाण्यात टाकली. यामुळे चालकाचा जीव वाचला.
समोर आलेल्या माहितीनुसार, दिवाडी फेरी धक्क्यावर एक व्यक्ती आपल्या मारुती इग्नीस या कारमध्ये बसली होती. चालकाला झोप लागली. मागे फेरी असल्याचा त्याला भास झाला व त्याने झोपेतच रिव्हर्स गियर टाकले. यामुळे गाडी धक्क्यावरून थेट पाण्यात गेली. मुळात मागे फेरीच नव्हती. पाण्यात पडल्यानंतर कारमधील चालकाने आरडाओरडा केला. झाला प्रकार येथील फेरीधक्क्यावर पार्क करून ठेवलेल्या फेरीबोट कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी लाईफ जॅकेट आणि रेस्क्यू ट्यूब पाण्यात टाकली. याच्या आधारे चालकाने पाण्यातून बाहेर येत आपला जीव वाचवला.
पहाटे सुमारे ३.०१ वाजता जुने गोवे येथील अग्निशामक दलाला तसेच पणजी मुख्यालयातील रेस्क्यू पथकाला या घटनेबाबत माहिती देण्यात आली. दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत पाण्यात पडलेली कार बाहेर काढली. याप्रकरणी पणजी मुख्यालयातील रेस्क्यू पथकाच्या समीर हजारे (लिडिंग फायर फायटर), सुरेंद्र कारबोटकर (ड्रायव्हर-ऑपरेटर) संदीप नाईक, राजेंद्र पेडणेकर (दोघेही फायर फायटर) तसेच जुने गोवे अग्निशामक दलाचे सब ऑफिसर रोहिदास परब यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील जल्मी (लिडिंग फायर फायटर),संजय सतरकर (ड्रायव्हर-ऑपरेटर), दत्ता सिनारी, प्रीतम कळंगुटकर, राजेश च्यारी, उद्देश गावस, काशीनाथ फोंडेकर (सर्व फायर फायटर) यांनी कामगिरी बजावली. अग्निशामक दलाच्या नोंदीनुसार या घटनेत सदर कारचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. जुने गोवे पोलीस स्थानकाचे पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.