उत्तर प्रदेशचे मंत्री दारा सिंह चौहान यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना आमंत्रण
प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या महाकुंभ २०२५ साठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यातर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रण देताना उत्तर प्रदेशचे मंत्री दारा सिंह चौहान, राज्यमंत्री रामकेश निशाद.
पणजी : यंदाच्या कुंभमेळ्यात ४५ कोटी भाविक सहभागी होणार आहेत, अशी आम्हाला आशा आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांसह समस्त गोमंतकीयांनी १२ वर्षांनी एकदा होणाऱ्या या कुंभमेळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मंत्री दारा सिंह चव्हाण यांनी केले आहे.
बारा वर्षांतून एकदा होणारा हा महाकुंभ मेळा १३ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर प्रयागराज येथे होणार आहे. या मेळ्यात सहभागी व्हावे म्हणून उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री दारा सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री सावंत यांना आमंत्रण दिले आहे. त्यानंतर याविषयी माहिती देण्यासाठी दोनापावल येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री रामकेश निशाद आणि वैभव श्रीवास्तव उपस्थित होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावतीने गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांना आम्ही महाकुंभ मेळ्याचे निमंत्रण दिले आहे आणि मुख्यमंत्री सावंत या महाकुंभ मेळ्यात सहभागी होणे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे मंत्री चौहान यांनी सांगितले.
आम्हाला खात्री आहे मुख्यमंत्री सावंत हे प्रयागराज महाकुंभ मेळ्यात सहभागी होणार आहेत आणि त्यांनी तसे मान्य केले आहे. सावंत यांनी तशी आमच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली आहे आणि आयोजकांचे नंबरही त्यांनी घेतले आहेत. आम्ही त्यांना सांगितले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांचे विशेष स्वागत करणार आहेत, असे मंत्री चौहान यांनी सांगितले.
आम्हाला विश्वास आहे या कुंभमेळ्यात मुख्यमंत्री सावंत यांच्यासमवेत त्यांचे इतर मंत्री व आमदारही सहभागी होतील. त्याचबरोबर समस्त गोमंतकीयांनी या महाकुंभमेळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
युनोस्कोकडून ‘सांस्कृतिक वारसा’ म्हणून मान्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली यंदाचा महाकुंभमेळा गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगम घाटावर होणार आहे. १२ वर्षांत एक वेळा होणारा हा महाकुंभमेळा युनोस्कोने सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे, असे चौहान यांनी सांगितले.