हैद्राबाद येथे होणाऱ्या उत्सव २०२४मध्ये प्रदान केले जाणार हे पुरस्कार
पणजी : सामाजिक सेवा तसेच वैद्यकीय शिक्षणातील योगदानासाठी भारतीय वैद्यक संघटनेकडून (आयएमए) गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रतिष्ठेचे तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हैद्राबाद येथे होणाऱ्या उत्सव २०२४मध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातील.वैद्यकीय विद्यार्थी संघटनेचे (एमएसएन) सल्लागार डॉ. जगदीश काकोडकर यांनी ही माहिती दिली.
विद्यार्थ्यांच्या मेडिकल स्टुडंट नेटवर्कला (एमएसएन) सामाजिक सेवा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय आयएमए एमएसएन राष्ट्रीय अध्यक्ष प्रशंसनीय पुरस्कार सुर्यम सिंग व अरिजित काकोडकर यांना प्राप्त झाला आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी तीन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांनी सामाजिक सेवा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हल्लीच झालेली मेडवेव्ह परिषद तसेच कॅन्सर तपासणी अभियानात सुद्धा त्यानी सक्रिय सहभाग घेतला आहे.