नकारात्मक प्रचारामुळे सर्वच राज्यात काँग्रेसचा पराभवः अरुण सिंह
पणजी : भारतीय जनता पक्ष (भाजप) जानेवारीत आपल्या नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड करणार आहे. बूथ समित्या, मंडल, जिल्हा आणि प्रदेश समित्यांची निवड झाल्यानंतर प्रदेश भाजप अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अरुण सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, प्रवक्ता सिद्धार्थ कुंकळ्येकर, दामू नाईक यांची उपस्थिती होती. अरुण सिंह यांनी गोवा भेटी दरम्यान सदस्य नोंदणी स्थितीचा आणि निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याची प्रगती सुरू आहे. सरकारच्या कामगिरीवर गोव्यातील जनता खूश आहे. 'हर नल से जल', 'आयुष्मान भारत', 'हर घर बिजली' या सर्व योजनांचा लाभ गोवेकरांना मिळत आहे.
यामुळेच गोव्याला ४ कोटी सदस्यांची नोंदणी करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यास मदत झाली आहे. देशात भाजपचे १२ कोटींहून अधिक सदस्य आहेत. यामुळे भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
आज २० हून अधिक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. काँग्रेस करत असलेला नकारात्मक प्रचार जनतेने नाकारला.
राहुल गांधी परदेशातही खोटी माहिती देऊन देशाला बदनाम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत आहे. संसदेच्या अधिवेशनापूर्वी अहवाल प्रसिद्ध करून सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र काँग्रेस पक्ष करत असल्याचा आरोप अरुण सिंह यांनी केला.
जामिनावर असलेल्यांनी केलेल्या आरोपांवर कोण विश्वास ठेवणार?
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांची आता जामिनावर सुटका करण्यात आली आहे. हे सर्वच भ्रष्ट असल्याने त्यांच्या आरोपांवर कोण कसा विश्वास ठेवणार? असा सवाल खासदार संजय सिंह यांनी केला. नोकरीसाठी पैसे घेतल्याचा आरोप विरोधक मुख्यमंत्र्यांवर करतात, मात्र त्यात मुळीच तथ्य नाही. या आरोपांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असे सिंग म्हणाले.