गोव्यासह कोकणात होती १२ दिवस उष्णतेची लाट

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th December, 12:53 am
गोव्यासह कोकणात होती १२ दिवस उष्णतेची लाट

पणजी : गेली काही वर्षे बदलत्या हवामानाचा फटका सर्व जगाला बसत आहे. राज्यासह संपूर्ण देशात अवकाळी पाऊस, वाढलेले तापमान, कमी होत असलेले थंडी याचा अनुभव येत आहे. राज्य सभेतील विविध प्रश्नांच्या उत्तरातून हीच माहिती समोर आली आहे. गेल्या २०२१ ते २०२४ दरम्यान गोव्यासह कोकण भागात १२ दिवस उष्णतेची लाट आली होती.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार राजीव शुक्ला आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केले होते. 

उत्तरात दिलेल्या माहितीनुसार २०२२ मध्ये गोव्यात २ दिवस, २०२३ मध्ये ६ दिवस तर २०२४ मध्ये ४ दिवस उष्णतेची लाट आली होती. या तीन वर्षात संपूर्ण देशात एकूण १२५१ दिवस उष्णतेची लाट होती. 

वरील कालावधीत उत्तर प्रदेशमध्ये १४२ तर राजस्थानमध्ये १४१ दिवस उष्णतेची लाट आली होती. उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, हवामान खात्याने राज्यांच्या आरोग्य खात्यांना सोबत घेऊन उष्णता कृती आराखडा तयार केले आहेत. 

अशा लाटेत कोणती काळजी घ्यावी यासाठी प्राधिकरणाने नियमावली बनवली आहे. याशिवाय हवामान खात्यातर्फे वेळोवेळी तीव्र हवामानाच्या आगाऊ सूचना दिल्या जात असल्याचे उत्तरात म्हटले आहे.

देशभरात १६३४ जणांचा मृत्यू
उष्णतेच्या लाटेमुळे संपूर्ण देशात २०१८ ते २०२२ दरम्यान ३७९८ मृत्यू झाले आहेत. सर्वाधिक १२७४ मृत्यू २०१९ मध्ये झाले होते. वरील पाच वर्षात उष्णतेमुळे गोव्यात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचे उत्तरात म्हटले आहे

हेही वाचा