९ डिसेंबर रोजी मडगांव येथे वितरण
पणजी : आदिवासी कल्याण खाते आणि उटातर्फे रेशम गावकर, बाबू गावकर, भालचंद्र उसगावकर आणि उपासो गावकर यांना आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्काराचे वितरण ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या ६ व्या आदिवासी विद्यार्थी संमेलनात होणार असल्याचे खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांनी सांगितले. शुक्रवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वासुदेव गावकर, दीपक करमळकर, विरा नाईक उपस्थित होते.
रेडकर यांनी सांगितले की, पुरस्कार विजेत्यांना शाल , श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि १ लाख रुपये देण्यात येणार आहेत. कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता मडगाव येथील रवींद्र भवन येथे होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कार्यक्रमाला आमदार गणेश गावकर, अंतोनियो वाझ, खात्याचे सचिव चेष्टा यादव, एसटी महामंडळ वासुदेव गावकर, एससी एसटी आयोगाचे दीपक करमळकर, उटा संघटनेचे प्रकाश वेळीप यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आदिवासी विद्यार्थी संमेलनात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये आणि प्रशस्ती पत्रक देण्यात येईल. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण तज्ञ डॉ.प्रणव वैद्य आणि पोलीस अधीक्षक सुनीता सावंत मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी सध्या सुरू असलेल्या खात्याच्या तीन योजना ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात दर महिन्याला पैसे जमा करण्यात येणार असल्याचे रेडकर यांनी सांगितले.