फोंडा शहरातील प्रकारामुळे वऱ्हाडी चकित : वरमाला न घालताच वर माघारी
फोंडा : राज्यात सध्या लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पण फोंडा शहरात एक अजब प्रकार घडला. लग्नाच्या सभागृहात पोहाेचण्यापूर्वी वधूने रस्त्यावरूनच आपल्या प्रियकरासह धूम ठोकली. त्यामुळे वधूच्या गळ्यात लग्नाची माळ घालण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वराला, नातेवाईकांना व मित्रमंडळींना गप्प राहून घरी जावे लागले.
दोन वेगवेगळ्या गावांतील वधू व वराचे लग्न ठरले. फोंडा शहरातील एका आलिशान सभागृहात लग्न समारंभ आयोजित करण्यात आला. लग्न समारंभाला येणाऱ्या अंदाजे ८०० नातेवाईक व मित्रमंडळींसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. लग्नासाठी वराच्या आणि वधूच्या कुटुंबियांनी लाखो रुपयांचा खर्च केला. सभागृहाच्या सजावटीवरसुद्धा मोठा खर्च करण्यात आला होता. हळद समारंभही मोठ्या दिमाखात वधू-वराच्या घरी करण्यात आला. लग्नाच्या दिवशी सर्व तयारी पूर्ण झाली होती. पण वधूने घात केल्याने बिचाऱ्या वराला डोके खाली घालून घर गाठावे लागले.
लग्नाच्या दिवशी सभागृहात सर्व तयारी पूर्ण झाली होती. लग्नाचा मुहूर्त दुपारचा असल्याने जेवणाची तयारीसुद्धा पूर्ण झाली होती. सभागृहात वरासह त्याच्या घरातील लोक व मित्रमंडळी पोहोचली होती. लग्न मुहूर्तावर लावण्यासाठी भटजींनी तयारी fकेली. वराच्या नातेवाईकांची मंडळी वधूला पाहण्यासाठी उत्सुक होते. त्यावेळी सभागृहाच्या बाहेर आलिशान वाहनातून आलेली वधू उतरताना अनेकांनी पाहिले. पण त्याचवेळी वधूच्या वाहनाजवळ एक कार येऊन थांबली. कारजवळ असलेल्या इतरांना काही कळण्यापूर्वीच वधूने कोणताही विचार न करता ती थेट कारमधून उतरून जवळच पार्क केलेल्या दुसऱ्या कारमध्ये जाऊन बसली. वधू कारमध्ये बसल्यानंतर वेळ न काढता कारचालकाने तेथून धूम ठोकली. परिसरात असलेल्या लोकांना वधूला रोखण्यासाठी वेळही मिळाला नाही. वधू दुसऱ्या कारमधून गेल्यानंतर मात्र लोकांना सत्य कळून चुकले.
सदर युवती एका युवकाच्या प्रेमात पडली होती. घरातील मंडळी जबरदस्तीने दुसऱ्या युवकासोबत लग्न लावून देत असल्याचे युवतीने आपल्या प्रियकराला कळविले होते. त्यामुळे लग्नापूर्वी सर्वांच्या समोरून पळून जाण्याचा प्रियकर व प्रेयसीचा डाव यशस्वी झाल्याची चर्चा फोंडा शहरात सुरू आहे.
लग्नाचा मुहूर्त जवळ येताच वधूने आपल्या प्रियकरासोबत पळ काढल्याने उपस्थित लोक चकित झाले. वधू पळून गेल्याचे कळताच सभागृहात सर्वांचीच धावपळ उडाली. त्यामुळे लग्नाची माळ घालण्याच्या प्रतीक्षेत असलेळ्या बिचाऱ्या वराला सावरण्याची वेळ उपस्थित लोकांवर आली.
अन्य एका लग्नात अहेर लंपास...
प्रियोळ भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका लग्न समारंभात अहेर म्हणून मिळालेली पाकिटे एका बॅगेत ठेवण्यात आली होती. पण उपास्थित लोकांची नजर चुकवून अज्ञाताने पाकिटे ठेवलेली बॅग चोरून नेण्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.