तारेवरची कसरत

समाजात सामाजिक, आर्थिक, मानसिक सर्वच आघाड्यांवर एकट्याने लढत देत, येईल त्या प्रसंगाला तोंड देत, हतबल न होता झुंज देणाऱ्या अशा एकल माता आपल्या आजूबाजूला दिसत असतात. आयुष्याच्या या वळणावर अनेक टक्के टोणपे खात उतार चढाव सहन, करत मुलांना वाढवणं, ही तारेवरची कसरत करत असतात.

Story: मनातलं |
23rd November, 12:58 am
तारेवरची कसरत

खरं तर निसर्गाने मुलं जन्माला घालून त्यांचं संगोपन करायची जबाबदारी दोघांवर म्हणजे आईवडिलांवर सोपवलेली आहे, पण सध्याच्या परिस्थितीत पाहता ही गोष्ट बदलत चाललेली दिसते. कारण काहीही असेल, पण एकल पालकत्व ही संकल्पना जोर धरू लागलेली दिसते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्याही अगदी पूर्वी म्हणजे जंगलात राहणारे लोक टोळके करून रहात. एकमेकांची सोबत, मदत, सहकार्य आणि आधारही आपोआपच मिळत होता. एकत्र कुटुंबात आत्या, काका, काकू, आजी-आजोबा यांच्या सहवासात, त्यांच्या देखरेखेखाली मुले कशी मोठी झाली हे ही कळत नसे. पण विभक्त कुटुंब पद्धती आली ‘मी आणि माझी मुले’ ही एवढीच कुटुंबाची मर्यादित व्याख्या बनली. पण त्यामुळे मुलांच्या संगोपनाचा प्रश्न बिकट होऊ लागला. 

सातत्याने सिंगल मदरची वाढत जाणारी संख्या हे सध्याचे वास्तव आहे. स्त्री ही नोकरी निमित्त बिझी असते. कधी नवऱ्याची बदलीची नोकरी, कधी त्याचे परदेशात राहणे, कधी एकमेकांशी न पटल्याने होणारे घटस्फोट, नवऱ्याने जबाबदारी न घेणे, अशा अनेक कारणांनी आईलाच मुले स्वतंत्र होईपर्यंत लक्ष पूरवावं लागतं. आपल्या समाजाच्या समजुती आणि रितीरिवाजाप्रमाणे ही जबाबदारी आईचीच मानली जाते. ती कुणी मुद्दामून स्वीकारत नाही. ती आपोआपच तिच्या अंगावर येऊन पडते. मुलांना त्यांच्या आवडी निवडी सांभाळून चांगले संस्कार देणं, आयुष्यात चांगला माणूस बनण्यासाठी सक्षम बनवणं, स्वत:ची जबाबदारी ओळखून वागायला शिकवणं, हे सर्वच आईला करावं लागतं. त्यातून ती नोकरी करणारी असेल तर ऑफिस सांभाळून मुलांसाठी वेळ काढणं, त्याच्या शाळेतल्या मीटिंगला हजर रहाणं, त्यांच्या आजारपणात लक्ष देऊन त्यांची निगुतीने काळजी घेणं हे सर्व करताना तिची तारेवरची कसरत चालू असते. 

वडील जवळ नसल्याने त्यांच्या वाट्याची कामेही तिलाच करावी लागतात. त्यासाठी टू व्हीलर, फोर व्हीलर तिला चालवायला यावीच लागते. त्याशिवाय तिचं टायमिंगचं गणित जुळत नाही. सतत अष्टभुजा देवी प्रमाणे होता होईल तितकी कामे आपल्या हातांनी पार पाडायचा तिचा प्रयत्न असतो. आज काय? कामवाली आली नाही, आज जरा मुलाला ताप आलाय, आज काय गाडीच बंद पडली, रीपेयर करायला हवी, कुणा मैत्रिणीच्या घरी बारसे, लग्न, डोहाळेजेवण असा काहीतरी समारंभ असेल, भाजी संपलीय, किराणा आणायला हवा, बिले भरायचीत, मुलांची स्विमिंगची फी भरायचीय… एक ना अनेक, अशा कितीतरी गोष्टींना सामोरं जावं लागतं. 

दररोजचा दिवस म्हणजे तिच्यासाठी एक नवीन आव्हान असतं. ते पेलण्याचा प्रयत्न करताना तिचे स्वत:च्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष होत असतं. काहींना त्याच काळात मेनोपॉज सुरू झालेला असतो. तिची चीडचीड, तिची घामाघूम परिस्थिति, अशक्तपणा ती कुणी लक्षात घ्यायला नसतं. अशा वेळी हवा असतो तो मजबूत आधार जो मानसिक आणि शारीरिक बळ देणारा असतो. तो आधार देणारा तिचा सहचर तिच्या सोबत नसेल तर तिचा कोंडमारा होतो, ती एकटी पडते. मुले मोठी झाली, त्यांच्या वाढत्या मागण्या, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना तिला नाकीनऊ येतात. पण कधी कधी तिला त्यांना स्पष्टपणे नाही म्हणता येत नाही आणि ती मुले मागतील त्या त्या गोष्टी त्यांना पुरवत राहते. परिणामी मुले स्वभावाने हट्टी होत जातात. मग तिला आपण कुठे कमी पडता कामा नये या भावनेतून त्यांची प्रत्येक मागणी पुरी करण्या खेरीज प्रत्यंतर रहात नाही. 

कधी कधी मग मुले त्यातून वाईट मार्गाला सुद्धा जाऊ शकतात. ही तिची जबाबदारी असते म्हणून वेळेतच त्यांना हट्ट करण्यापासून रोखायला पाहिजे आणि चांगलं काय वाईट काय याची जाणीव करून द्यायला हवी. कारण ती आईही असते आणि बाबाही. काही मतभेदांमुळे एकत्र कुटुंबापासून ती दूर रहात असली तरी नात्याने ज्याच्याशी आपल्या कुटुंबाशी नाळ जुळलेली असते ती नाळ टिकून राहण्यासाठी त्यांच्याकडे वारंवार मुलांना घेऊन जाणे, त्यांच्याशी सुसंवाद साधणे हे गरजेचे असते. म्हणजे वेळ प्रसंगी तुम्हाला मदतीला हाक मारायला कुणीतरी आहे हा आधार मानसिक बळ देतो. स्वत:च्या जबाबदाऱ्या कुणाच्या आधाराशिवाय पार पाडल्या, तरी प्रत्येक वेळी पालकांविषयी थॅंकफुल असण्याची भावना मुलांसामोर प्रकट केली पाहिजे. तरच त्यांनाही पालकांविषयी मनात आदराची भावना कायम राहील. कारण मुले आईचे अनुकरण करत असतात. म्हणून त्यांच्या शारीरिक विकासापेक्षा त्यांच्या मनाची जडण घडण नीट होते की नाही हे पाहिलं पाहिजे. त्यांच्यासाठी खास वेळ दिला पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी त्यांचं वेळोवेळी कौतुक केले पाहिजे. 

समाजात सामाजिक, आर्थिक, मानसिक सर्वच आघाड्यांवर एकट्याने लढत देत ,येईल त्या प्रसंगाला तोंड देत, हतबल न होता झुंज देणाऱ्या अशा एकल माता आपल्या आजूबाजूला दिसत असतात आयुष्याच्या या वळणावर अनेक टक्के टोणपे खात उतार चढाव सहन, करत मुलांना वाढवणं, ही तारेवरची कसरत करत असतात.  हातात काठी घेऊन तारेवरती आपला तोल सांभाळत चालणारी एखादी डोंबारी स्त्री पहिली की लक्षात येतं किती अवघड आहे ही गोष्ट. कधीही तोल जाऊन जमिनीवर आदळण्याची शक्यता असते. तरीही आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करून समोरचा मार्ग चालत राहणं ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पण त्याचवेळी खाली उभा राहिलेला तिचा जोडीदार तिला ढोलकी वाजवून साथ देत असतो. तेवढ्या आधाराने सुद्धा तिच्या अंगात स्फुरण येत असतं. त्याची तेवढी साथसंगत तिला पुरेशी असते अवघड तारेवरची कसरत करायला. जीवनात ही तसंच असतं. प्रत्यक्षात नसेना का तो जवळ, पण दूर राहूनही मी तुझ्या सोबत आहे ही भावना तिच्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी तरी त्याने घ्यायला हवी. तर तिच्या अंगी हत्तीचे बळ आल्याशिवाय रहाणार नाही.

आता तर मूल दत्तक घेऊन वाढवणाऱ्या ही एकट्या माता समाजात दिसू लागल्या आहेत. लग्नाची जबाबदारी नको असलेल्या, पण मातृत्वाची ओढ असलेल्या स्त्रिया आपली ही एकल पालकत्वची जबाबदारी पार पडताना दिसू लागल्या आहेत. कधी कधी अशा एकट्या स्त्रीने मुले वाढवणे या क्रियेत फायदे ही असतात. ती स्त्री आपले निर्णय स्वत:च घेत असल्याने कुणावर अवलंबून नसते. मुलांसाठी पालक चांगलेच असतात पण पालकांमध्ये विसंवाद असतील, तर मुलांना घरातली भांडाभांडी विसंवाद यांना तोंड द्यावे लागते ते इथे होत नाही. आईची शिकवण्याची पद्धत अंगवळणी पडते. त्यात बदल होत नाही. आईत आणि मुलात जास्त जवळीक असते. 

पण अजूनही आपल्या समाजात मग वडिलांचे नावापुरते तरी अस्तित्व असायला हा अट्टाहास असतोच. एखाद्या पुरुषाला बायको नसेल आणि मुलांना वाढवायचे असेल तर आपण लगेच त्याच्या दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव ठेवतो.  त्यावेळी कारण सांगताना मात्र ‘मुलांना आई हवीच’ हे असते. पण स्त्री मात्र नवऱ्याशिवाय ही जबाबदारी समर्थपणे पेलताना दिसते. तिने मुलांसाठी दुसऱ्या पुरुषाचा आधार घ्यायचा प्रयत्न केला, तर तिला दूषणे लावली जातात. ही समाजाची रितच आहे म्हणूनच ती तारेवरची कसरत करायला तयार असते.


प्रतिभा कारंजकर, फोंडा