शेवटी आपल्याला साजेसा जोडीदार निवडायचे स्वातंत्र्य असतेच. आपल्या जोडीदाराने छान रहावे, नीट वागावे या अपेक्षा रास्तच आहे. आरोग्याचा विचार करता जोडीदाराने आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावे ही अपेक्षा देखील रास्तच आहे.
गोरीपान, सुंदर, बांधेसूद, उंच, देखणा, सुबक, सडसडीत ही सगळी विशेषणे एका ठराविक गोष्टीसाठी-लग्न जमवण्यासाठी वापरली जात होती. वापरली जात होती अशासाठी म्हणते कारण मला वाटत होते की आता ही प्रथा बंद झाली असेल. फोटोवरून निवड, मग पुढे भेटी, योग्य वाटले तर कुटुंबासोबत भेटी आणि मग पुढची बोलणी असा साधारण क्रम मला माहीत आहे. यातही सुरुवातीची निवड फोटोवरून होत असली तरीही उघड उघड रंगाची आणि बांध्याची विशेषणे वापरली जात असतील याची मला कल्पना नव्हती.
साधारण माझ्या पिढीतल्या लोकांना विचारले, तर या विशेषणांच्या आधारावर जोडीदार निवडणे किंवा नाकारणे ह्या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी शक्य नाहीत. खरेतर, पहिल्या भेटीसाठी आवश्यक असणाऱ्या माहितीमध्येदेखील या गोष्टींची गरज असते का हा प्रश्न उपस्थित राहिला तो हल्लीच समाज माध्यमांवर दिसणाऱ्या वधू-वर सूचक मंडळांच्या जाहिरातींमुळे! स्थळांची माहिती देताना आधी त्यांचा वर्ण, दिसणे, उंची, जाडी याची माहिती आधी देऊन नंतर त्यांचे शिक्षण, व्यवसाय किंवा नोकरी, आर्थिक प्राप्ती याबद्दल लिहिलेले बघितले. म्हणजेच वर्ण वगैरे मुद्दे ‘स्क्रिनिंग'साठी आणि ते पटले तर अधिक महत्त्वाचे मुद्दे नंतर! मुळात, आपले वर्णन करताना आजकालच्या मुलामुलींना ही अशा प्रकारची विशेषणे वापरलेली चालत आहेत हा माझ्यासाठी मोठा धक्काच होता. आईबाबांच्या दबावामुळे कदाचित ‘जाऊ दे, काय वाटेल तर करू दे.’ असं म्हणत मुलामुलींनी याकडे फार लक्ष दिलं नसेल. कदाचित हे आईवडील परस्पर करत असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. किंवा असेही असू शकते की एकदा आपले स्थळ अमुक एका संस्थेत नोंदवले तर आपली जाहिरात ते कशी करतील यावर आपले काहीच नियंत्रण राहत नसेल.
गेले काही दिवस या जाहिराती दिसत राहिल्या आणि त्यातून गेले अनेक दिवस माझ्या युट्यूबवरच्या सजेशन्समध्ये दिसत असणारा पण अजूनपर्यंत कधीच बघावासा न वाटलेला ‘व्हेन अ डार्क बॉय मीट्स अ फॅट गर्ल’ हा लघुपट आठवला आणि मी तो बघितला. परत परत काय आणि किती वेळा त्याच गोष्टींवर बोलायचं? आत्तापर्यंत कथा, कादंबऱ्या, चित्रपट या सगळ्यांमधून कितीवेळा हे रडगाणे गाऊन झाले आहे! म्हणून कदाचित मी हा लघुपट बघितला नव्हता. गोष्ट नेहमीचीच आहे, दिसण्यामुळे मग तो काळेपणा असू दे किंवा जाडी असू दे, लग्नासाठी नकार मिळणे. गोष्ट काही फार खास नाही किंवा नेहमीच्या गोष्टींपेक्षा खास अशी वेगळीही नाही तरीही आज त्याबद्दल लिहावेसे वाटले.
आजकाल, प्रत्येक भेटीपूर्वी ऑनलाइन भेटी होत असतात. ऑनलाइन बोलणे सोपे वाटते. बोलण्याचा चेहरा दिसत नसेल तर ती व्यक्ती कशी दिसते यापेक्षा जास्त लक्ष ती व्यक्ती काय बोलतेय याकडे जात असावे. पण, भेटल्यावर मग त्या व्यक्तीच्या दिसण्याने विचलित होण्याची शक्यता का असते? उत्तर सोपे आहे, आपण आदर्श नसतोच आणि आपण राहत असलेले हे जगही आदर्श नसते. त्यामुळे आपल्या जोडीदाराच्या विचारांबरोबरच त्याचे दिसणेही महत्त्वाचे असले तर ते अगदीच चुकीचे आहे असे नाही. प्रश्न आहे प्राधान्याचा. जोडीदार निवड हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरीही जी व्यक्ती या सगळ्या कारणांमुळे नाकारली जात असते तिच्यासाठी ह्या लघुपटात एक छान संदेश दिला आहे.
या लघुपटात अजून एका महत्त्वाच्या गोष्टीवर भाष्य केले आहे. गोऱ्या रंगाला दिलेल्या महत्त्वामुळे आपल्याकडे काळया रंगाला कमी लेखले जाते, इतके की काहीवेळा सावळी आहे पण तरी सुंदर आहे. किंवा जरा काळसर आहे पण देखणी आहे. ह्या 'पण’मुळे होणारे मानसिक खच्चीकरण भयंकर असते. लघुपटाच्या शेवटी, आपण स्वतःला स्वीकारणे महत्त्वाचे आहे हा संदेश आहेच. एरवी लघुपटात काही नवीन नसले तरीही या काही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत.
शेवटी आपल्याला साजेसा जोडीदार निवडायचे स्वातंत्र्य असतेच. आपल्या जोडीदाराने छान रहावे, नीट वागावे या अपेक्षा रास्तच आहे. आरोग्याचा विचार करता जोडीदाराने आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावे ही अपेक्षा देखील रास्तच आहे. पण निवड करताना मात्र याचबरोबर आचार विचार, शिक्षण यासारख्या गोष्टींना प्रथम प्राधान्य दिले गेले तर ते एकत्र आयुष्य जगण्यासाठी जास्त छान, नाही का?
समाजाची विचारधारा बदलायला अनेक पिढ्या जाव्या लागतात. पूर्वीच्या काळी वधू परीक्षा करायचे. त्यात म्हणे अनेक गोष्टी तपासायचे! इतके की वधूला पाय ओले करून चालायला लागायचे. का? तर तिच्या पावलांचा आकार बघण्यासाठी! आता आपण बरेच पुढे आलो आहोत, अजूनही पुढे जायचे आहे त्यामुळे आपण आपल्या कोणत्या गुणांना अधोरेखित करण्याचे अधिकार या वधू वर सूचक मंडळांना देतोय याबद्दल मुलांनी आणि पालकांनीही जागरूक असावे असे मनापासून वाटते.
मुग्धा मणेरीकर, फोंडा