निरोगी आरोग्यासाठी किती झोप आवश्यक?

झोप आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपल्या दिनक्रमावर आणि एकूण आरोग्यावर झोपेचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो.

Story: आरोग्य |
23rd November, 12:50 am
निरोगी आरोग्यासाठी किती झोप आवश्यक?

झोप शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देते व पुढच्या दिवसासाठी तयार करते. पुरेशा झोपेमुळे शरीरासोबत मन, बुद्धि आणि इतर इंद्रियेही ताजेतवानी होतात. पण प्रमाणापेक्षा जास्त झोप किंवा कमी झोप घेतली तर आजारी पडण्याची देखील शक्यता असते.

ताण-तणाव, दिवसभराची धावपळ यामुळे आपल्या झोपेवर वाईट परिणाम होतात. अपुर्या किंवा तुटक झोपेमुळे अपचन, गॅस, अ‍ॅसिडीटी अशा समस्या उद्भवू शकतात. हार्मोनल इम्बॅलेन्स होऊन वेगवेगळ्या शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. हृदयरोग, रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका निर्माण होऊ शकतो. निरोगी आरोग्यासाठी शांत आणि पुरेशा प्रमाणात झोप मिळणे आवश्यक आहे. पूर्ण झोपेमुळे आपल्या सर्व शारिरीक क्रिया सुरळीत पार पडतात. आपला मेंदू, इंद्रिये आणि इतर अवयव अगदी पूर्ण क्षमतेने काम करण्याच्या स्थितीत राहतात.

तसे पाहिलं तर झोपेचा कोणताही परिपूर्ण कालावधी नसतो, तो विविध घटकांवर अवलंबून असतो. मद्यपान, कॉफी आणि एनर्जी ड्रिंकसारख्या गोष्टींचा आपल्या दिनचर्येवर परिणाम होतोच. पण संशोधनानुसार किती तास झोप घ्यावी हे प्रत्येक व्यक्तीच्या वयावर अवलंबून असते. आपल्या वयानुसार किती झोप आवश्यक आहे हे आपण जाणून घेऊयात...

नवजात (०-३ महिने)- नवजात बालकांना त्यांच्या जलद मानसिक आणि शारीरिक विकासासाठी प्रौढांपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असते. त्यांना दररोज १४-१७ तासांची झोप आवश्यक असते. 

शिशु (४-११) महिने- बाळांच्या झोपण्याच्या पद्धतीत बदल दिसून येतो. या काळात झोप दररोज १२-१५ तास एवढी लागते. 

१-२ वर्षे वयोगटातील बालके - या वयादरम्यान दररोज साधारणपणे ११-१४ तासांची झोप आवश्यक असते.

३-५ वर्षे वयोगटातील बालके - दररोज १०-१३ तास झोप लागते व ही वेळ हळूहळू कमी होत जाते.

शालेय वयाची मुले (६-१३ वर्षे) - या वयात दररोज झोप ९-११ तास लागते. या वयात झोपण्याची वेळ निश्चित करणे आणि झोपण्याच्या वेळेची नियमित दिनचर्या लागू करणे महत्त्वाचे आहे. 

किशोरवयीन मुलं (१४-१७) - यांना दररोज ८-१० तास झोप लागते. किशोरवयीन मुलांची झोपेची पद्धत अनियमित असते. ते सहसा रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, ज्यामुळे त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. 

प्रौढ (१८-६४ वर्षे) - ७-९ तास झोप घेणं आवश्यक आहे. पुरेशी झोप न घेतल्यास झोपेचं नियमन करण्याशी संबंधित न्यूरॉन्स हळूहळू नष्ट होऊ शकतात.

वृद्ध (६५+ वर्षे) - अनेक वृद्धांना त्यांच्या गरजेपेक्षा कमी झोप मिळते. परंतु त्यांनाही साधारणपणे किमान ७ तासांची झोप आवश्यक असते.

सदृढ व्यक्तीला काही रात्री पुरेशी झोप न मिळाल्याने त्या व्यक्तीचे शरीर प्री-डायबेटिक अवस्थेमध्ये जाऊ शकते. म्हणजेच शरीराची रक्तातील ग्लुकोज स्तर नियंत्रण करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते. अपुरी झोप झाल्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता कमी होते आणि लसीकरणाचा प्रभाव कमी होतो. शरीरातील ग्रेलिन नावाच्या हार्मोनचे प्रमाण वाढते ज्यामुळे भूकेचे प्रमाण वाढते. व लेप्टिन नावाच्या हार्मोनचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे जेवण झाल्यावर समाधान मिळत नाही व सतत खावे वाटते. 

दिवसातील वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी घरी आल्यावर चुकीच्या वेळी झोपतात किंवा कमी झोप घेतात. त्यांना मधुमेह आणि अतिरक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. याकारणामुळे शिफ्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते.

संशोधनानुसार पुरुषांपेक्षा महिलांना जास्त झोप लागते. किशोरवयीन मुलींना ८ ते १० तासांची झोप आवश्यक असते. तर २४ ते ६४ वर्षे वयोगटातील महिलांनी दिवसातून ७ तास झोप घेणे आवश्यक आहे. महिलांचा मेंदू पुरूषांपेक्षा जास्त काम करतो, ज्यासाठी त्यांना पुन्हा रिकव्हर होण्यासाठी रात्री अधिक झोपेची आवश्यकता असते. यामुळे प्रत्येक 

स्त्रीने पुरुषापेक्षा २० मिनिटे जास्त झोपले पाहिजे.

महिलांमध्ये कमी झोपेमुळे स्तनाच्या कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. कमी झोप घेतल्याने शरीराच्या इतर पेशींवरही वाईट परिणाम होतो. पुरेशी झोप न मिळाल्यास शरीरातील खनिजांचे संतुलन बिघडू लागते, हाडेही हळूहळू कमकुवत होऊ लागतात.

जशी व्यायाम करून स्नायूंची ताकद वाढते, तशीच झोपेने मेंदूची! यामुळे पुरेशी आणि उत्तम झोप ही मानवी आरोग्यासाठी अगदी आवश्यक आहे.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर