पणजी : राज्यात होणाऱ्या ५५ व्या इफ्फीची तयारी पूर्णत्वास येत आहेत. १५ नोव्हेंबर पर्यंत इफ्फीशी संबंधित सर्व कामे पूर्ण होतील. यानंतर १८ रोजी पुन्हा कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. यंदाच्या इफ्फीत शिगमोत्सव आणि कार्निवलमध्ये पारितोषिक मिळवलेल्या चित्ररथांची विशेष परेड होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी यावेळी दिली. आज सोमवारी त्यांनी विविध खात्यांसोबत इफ्फीच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव डॉ. व्ही कांडावेलू, पोलीस महासंचालक आलोक कुमार व अन्य अधिकारी उपस्थित होते.
इफ्फीचा उद्घाटन आणि समारोप सोहळा २० रोजी डॉ. शामा प्रसाद मुखर्जी स्टेडीयम होणार आहे. नंतर २२ रोजी गोवा मनोरंजन संस्था ( ईएसजी ) ते कला अकादमी या मार्गावर चित्रपट सृष्टीशी संबंधित थीम बेस्ड चित्ररथ मिरवणूक होईल. यंदा प्रथमच वागातोर येथील पार्किंगच्या जागेत ओपन एअर स्क्रिनिंग केले जाणार आहे. तसेच मिरामार समुद्र किनारी देखील ओपन एअर स्क्रिनिंगची सोय असेल. या दोन्ही ठिकाणी मोफत चित्रपट दाखवले जाणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
याशिवाय आयानॉक्स पणजी आणि मडगाव, मॅजिक मूव्ही फोंडा, सम्राट अशोक या चित्रपटगृहांत इफ्फीच्या प्रतिनिधींना चित्रपट दाखवण्यात येतील. कला अकादमी येथे केवळ 'मास्टर क्लास' आणि 'इन कॉन्वरसेशन विथ' या सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. डी बी फुटबॉल मैदानावर विशेष मैदान उभारण्यात येत आहे. ईएसजी समोरील जागेत खाद्य पदार्थ आणि हस्तकलेचे स्टॉल लावण्यात येतील. तर योगसेतु जवळ विशेष प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याचेही मुख्यंत्र्यांनी सांगितले.
३६५९ प्रतिनिधींची नोंदणी
इफ्फीसाठी आतापर्यंत ३६५९ प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. शेवटच्या दहा दिवसात नोंदणीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यासाठी साधारणपणे ८ ते ९ हजार प्रतिनिधींची नोंदणी होते. राज्य सरकारतर्फे यंदाच्या इफ्फीसाठी सुमारे २६ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे, अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.