पीडब्ल्यूडीमार्फत दुरुस्ती : महिला डॉक्टरांची व्यवस्था करण्यास अडथळा
पणजी : कोलवाळ कारागृहात शौचालयाचे दरवाजे बसविण्यासह अन्य कामांना सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती कारागृहाच्या अतिरिक्त महानिरीक्षक स्नेहल गोलतेकर यांनी दिली. इमारतीचे रंगरंगोटी तसेच इतर कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कारागृह महानिरीक्षक कार्यालयाने कोलवाल कारागृहाच्या इमारतीची दुरुस्ती व पाणी पुरवठ्याबाबत संबंधित खात्यांना कळवले आहे. निविदा काढून कामे करणे ही संबंधित विभागांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कोलवाळ कारागृहात कैद्यांसाठी मूलभूत सुविधा नसल्याच्या तक्रारी कैद्यांकडून केल्या जात होत्या. त्यानंतर मानवाधिकार आयोगाने कारागृहाची पाहणी केली. मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष डेस्मंड डिकोस्ता, सदस्य प्रमोद कामत व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. कोलवाळ कारागृहात पुरुषांसह महिलांच्या स्वच्छतागृहांना दरवाजे नाहीत. यामुळे कैद्यांची गोपनियता धोक्यात येते, असे मानवाधिकार आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. इमारत दुरुस्ती तसेच पेंटिंग करण्याची शिफारस केली जाते. साबांखामार्फत इमारतीची दुरुस्ती करण्यात येत आहे. शौचालयाचे दरवाजा तुटले असून ते प्राधान्याने बसवले जातील, असे अतिरिक्त कारागृह महानिरीक्षकांनी सांगितले.कोलवाळ कारागृहाच्या देखभालीसाठी अर्थसंकल्पात तरतूद आहे. त्यानुसार कामे करण्याची जबाबदारी साबांखाची आहे. साबांखाने दुरुस्ती तसेच इमारतीची देखभाल करावी. मानवाधिकार आयोगाच्या अहवालाची प्रतही आम्ही साबांखाला त्वरित पाठवून देणार आहोत.
कोलवाल कारागृहात पाण्याची व्यवस्था आहे. थंड पाण्यासाठी कूलर आणि गरम पाण्यासाठी हिटर बसवण्याची तजवीज दुरुस्ती कामात केलेली आहे. कुलर आल्यानंतर त्वरित तो बसविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
परदेशी कैद्यांना वेळेवर व्हिसा मिळत नसल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. व्हिसासाठी इतर खात्यांशी व्यवहार करावा लागतो. त्यामुळे विलंब होत आहे. इतर खात्यांनी प्रक्रिया जलद केल्यास परदेशी कैद्यांना लवकर व्हिसा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
मानवाधिकार आयोगाने अहवालात केलेल्या शिफारशींचा अभ्यास सुरू आहे. इतर खात्यांशी पत्रव्यवहार करून कारवाई केली जाईल. या इमारतीची देखभाल दुरुस्ती साबांखाकडे असून डॉक्टर आणि नर्सची व्यवस्था आरोग्य खात्याकडे आहे. दरम्यान, सर्व कामांसाठी इतर खात्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने सदर कामाला विलंब होत आहे, असे कारागृहाचे अतिरिक्त महानिरीक्षक म्हणाले.
आरोग्य खात्यात नर्स, डॉक्टरांची कमतरता
आरोग्य खात्यात महिला परिचारिका (नर्स) आणि महिला डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे कारागृहात महिला कैद्यांची तपासणी करण्यासाठी महिला डॉक्टर आणि नर्सची व्यवस्था करून देणे अशक्य आहे. आरोग्य खात्याने महिला डॉक्टर आणि नर्सची कारागृहात बदली केल्यास व्यवस्था होऊ शकते. दरम्यान, कारागृहातील कैद्यांची तपासणी करण्यासाठी पुरुष डॉक्टर आणि नर्सची संख्या वाढवण्याची प्रक्रिया सुरू आहे.