टीम इंडियाचा पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय

महिला टी-२० विश्वचषक : अरुंधती रेड्डी सामनावीर

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
07th October 2024, 12:28 am
टीम इंडियाचा पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय

दुबई : महिला टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील सातव्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १०६ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने १८.५ षटकांत ४ गडी गमावून सामना जिंकला. हरमनप्रीत कौरने टीम इंडियासाठी कर्णधारपदाची खेळी खेळली. शेफाली वर्मानेही दमदार कामगिरी केली. श्रेयंका पाटील आणि अरुंधती रेड्डी यांनी गोलंदाजीत आपली ताकद दाखवली. अरुंधती रेड्डी ही सामन्याची मानकरी ठरली.
भारताची चांगली सुरुवात
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाने चांगली सुरुवात केली होती. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्यात चांगली भागीदारी बहरणाच एवढ्यात सादिया इक्बालने भारतीय उपकर्णधाराला बाद केले. या सामन्यात मानधना केवळ सात धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. भारताला पहिला धक्का १८ या धावसंख्येवर बसला. यानंतर जेमिमाने पदभार स्वीकारला. तिने शेफालीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. सलामीची फलंदाज शेफाली संघाची धावसंख्या ६१ असताना १२व्या षटकात बाद झाली. तिला आलियाने ओमैमा सोहेलकरवी झेलबाद केले. शेफाली ३५ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ३२ धावांची इनिंग खेळून बाद झाली. तर जेमिमाने २८ चेंडूत २३ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या रिचा घोषला एकही धाव करता आली नाही.
कर्णधार हरमनची दमदार खेळी
या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र, सामना जिंकण्यापूर्वीच ती दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाली. तिने २४ चेंडूत २९ धावांची दमदार खेळी खेळली आणि भारताला विजयाच्या जवळ नेले. त्यानंतर दीप्ती शर्मा आणि सजीवन सजना अनुक्रमे सात आणि चार धावांची नाबाद खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अशा प्रकारे भारताने १८.५ षटकांत ४ बाद १०८ धावा करत लक्ष्य गाठले.
पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना कर्णधार फातिमा सनाने ४ षटकात २३ धावा देत २ बळी घेतले. सादिया इक्बालने ४ षटकात २३ धावा देत १ बळी घेतला. सोहेललाही एक यश मिळाले. तिने ३ षटकांत १७ धावा दिल्या.
पाकिस्तानकडून निदा दारच्या सर्वाधिक धावा
तत्पूर्वी, टी-२० विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ८ गडी गमावून १०५ धावा केल्या. यादरम्यान पाकिस्तान संघाकडून निदा दारने सर्वाधिक धावा केल्या. तिच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांची वैयक्तिक धावसंख्या गाठता आली नाही. पाकिस्तानकडून निदा दारने ३४ चेंडूत सर्वाधिक २८ धावा केल्या. सलामीवीर मुनिबा अलीने २६ चेंडूत १७ धावांचे, तर फातिमा सनाने ८ चेंडूत १३ धावांचे योगदान दिले. सईदाने नाबाद १४ आणि नशराने नाबाद ६ धावा केल्या. गुल फिरोजा आणि तुबा हसन यांना खातेही उघडता आले नाही. या डावात पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी कोसळली.


अरुंधती रेड्डीचे सर्वाधिक ३ बळी
भारतीय गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी करत पाकच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर फटकेबाजी करण्याची संधी दिली नाही. भारताकडून अरूंधती रेड्डीने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर श्रेयंका पाटीलने २ बळी घेतले. रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी २ बळी घेतला. अरूंधतीने ४ षटकात १९, श्रेयंकाने ४ षटकांत १२, रेणूकाने ४ षटकांत १२, दीप्तीने ४ षटकांत २४ आणि शोभनाने ४ षटकांत २४ धावा दिल्या.
दरम्यान, टीम इंडियाचा या स्पर्धेतील तिसरा सामना हा श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. हा सामना ९ ऑक्टोबरला होणार असून टीम इंडियाला या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.
भारताचे सेमीफायनलचे गणित अधिक बिकट
टीम इंडियाने पाकिस्तानला पराभवची धूळ जरी चारली असली तरी ‘अ’ गटात असलेल्या भारताची सध्याची स्थिती पाहता टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारताने पाकिस्तानला पराभूत करून २ गुण मिळवले असले तरी पाकिस्तानचा संघ नेट रनरेटच्या बाबतीत भारतापेक्षा वरचढ ठरला आहे. पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानंतर टीम इंडिया पाईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी पोहोचली आहे. दोन अंकासह इंडियाचा नेट रननेट -१.२१७ झाला आहे. तर पाकिस्तान दोन गुणांसह +०.५५ नेट रननेटसह तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे सेमीफायनलचे गणित अधिक बिकट होत चालले आहे.