दोन्ही गटांचे एकमेकांवर आरोप : १५ मिनिटांत सभा आटोपती घेऊन केंद्रीय समितीचा ‘सभात्याग’
केंद्रीय समितीच्या गटाने सभात्याग केल्यावर दुसऱ्या गटाने निवडलेल्या पंधरा तालुका प्रतिनिधींसह इतर मान्यवर. (अक्षंदा राणे)
वास्को : गोमंतक भंडारी समाजाने रविवारी बोलाविलेल्या आमसभेत वादावादी, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, मुख्य दरवाजा अडविणे वगैरे प्रकार घडले. अवघ्या पंधरा मिनिटांत विषय पटलावरील विषय संपल्यानंतर अध्यक्ष अशोक नाईक व कार्यकारिणी समितीने तेथून जाणे पसंत केले. निवडणूक १७ नोव्हेंबरला घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तथापि उपस्थितांनी हरकत घेऊन त्याच व्यासपीठावर अॅड. रविराज चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन काही महत्त्वाचे ठराव संमत केले. दोन्ही गटांनी एकमेकांची बैठक बेकायदेशीर असल्याचा दावा करून काही मुद्दे उपस्थित केले.
गोमंतक भंडारी समाजाने येथील कोमुनिदाद हॉलमध्ये आमसभा बोलाविली होती. यावेळी अध्यक्ष अशोक नाईक, उपाध्यक्ष देवानंद नाईक, सरचिटणीस फक्रू पणजीकर व इतर पदाधिकारी, सदस्य व्यासपीठावर होते. आमसभा सुरू होताच एक सदस्य प्रश्न उपस्थित करण्यासाठी उभा राहिला असता, तेथे असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने त्याला रोखले. त्यामुळे तेथे एकच गोंधळ सुरू होऊन, पोलिसांना हुसकावून लावण्यात आले. त्यामुळे पोलीस हॉलबाहेर उभे राहिले. यानंतर मागील इतिवृतांत वाचन, जमाखर्चाला मान्यता देणे, निवडणूक समिती निवडणे, निवडणुकीची तारीख जाहीर करणे, हे चार विषय घाईगडबडीने मांडण्यात आले. अवघ्या काही मिनिटांत बैठक संपल्याचे जाहीर करून कार्यकारिणी समितीचे पदाधिकारी व सदस्य व्यासपीठाखाली उतरले. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला. बाहेर जाण्याचा दरवाजा अडविण्यात आल्यावर तेथे एकमेकंच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांसमवेत अध्यक्ष व इतर काहीजण बाहेर पडले.
यानंतर उपस्थितांनी अॅड. चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. याप्रसंगी म्हापसाचे माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, म्हापशाच्या माजी नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, गजानन (भाई) नाईक, प्रदीप नाईक, मुरगावचे दीपक नाईक, शरद चोपडेकर, अॅड अनिश बकल, मानस अस्नोडकर, तारक आरोलकर व इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या प्रश्नांना सामोरे जाता येत नसल्याने अशोक नाईक व इतरांनी घाईगडबडीने आमसभा आटोपती घेऊन समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी खुर्ची सोडावी, असे आवाहन केले. समाजाच्या मालमत्तेवर कब्जा करण्याचा प्रयत्न चालला आहे, असे दावे करण्यात आलेत. विद्यमान कार्यकारिणीवर अनेक आरोप करताना समाजबांधवांनी एकजूट ठेवावी, असे आवाहन करण्यात आले.
अशोक नाईक यांनी फेटाळले आरोप
यानंतर अशोक नाईक गटाने पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळून लावले. आम्ही जी घटना दुरुस्ती केली आहे, तिला जिल्हा निबंधकांनी मान्यता दिल्याचे सांगितले. आम्ही आमसभेतून पळ काढला नाही. आम्ही विषयपटलावर जे विषय होते, त्यासंबंधी ठराव घेतल्यावरच आमसभा आटोपती घेतली असल्याचा दावा करण्यात आला. या पत्रकार परिषदेला अशोक नाईक, देवानंद नाईक, फक्रू पणजीकर, सुनील नाईक, संध्या पालयेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
१७ नोब्हेंबरला निवडणूक : अशोक नाईक
आम्ही १७ नोब्हेंबरला निवडणूक घेणार आहोत. त्यासंबंधीची प्रक्रिया करण्यासाठी आम्ही रामदास पेडणेकर, अॅड. सुरेश नाईक चोपडेकर, शिवानंद तळकर, अॅड. केदार शिरगावकर, वामन वैद्य यांचा समावेश असलेली समिती निवडण्यात आली आहे. समाजामध्ये एक गट आहे की, जो प्रत्येक आमसभेत गोंधळ घालतो. त्यांना आमसभा सुरळीत झालेली नको आहे. आजच्या आमसभेतही भांडणे करण्याचा त्यांचा हेतू होता, असा आरोप अशोक नाईक यांनी केला. आमच्या घटनेत कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणुक घेण्याची तरतूद आहे. कार्यकारिणी नेमता येत नसल्याचा दावा त्यांनी केला.
आमसभेत नवी समिती नियुक्त
आमसभेत अशोक नाईक व गटाला कोणतीही मान्यता न देता समाजाचे सर्व विषय हाताळण्यासाठी बाराही तालुक्यांतील ज्ञाती बांधवांचा समावेश असलेली समिती निवडण्यात आली. ती पुढीलप्रमाणे आहे. उपेंद्र गावकर (डिचोली), तारक आरोलकर, संदीप वेर्णकर ( बार्देश), आकाश गावणेकर, गोरख केरकर (तिसवाडी), अविनाश शिरोडकर (सासष्टी), दिलीप नाईक, हनुमंत नाईक (फोंडा), विनोद नाईक (केपे), दामोदर नाईक (सांगे), शरद चोपडेकर (मुरगाव), उमेश नाईक (धारबांदोडा), व्यंकटराय नाईक (काणकोण), उमेश तळवणेकर (पेडणे), शिवदास माडकर (सत्तरी).