म्हापसा : येथील बार्देश उपनिबंधक कार्यालयतून जमिनीची तीन विक्रीपत्रे (सेल डीड) चोरीला जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी उपनिबंधक ऋषिक नाईक यांच्या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
म्हापसा येथील बार्देश उपनिबंधक कार्यालयातून मे व जून २०२४ मध्ये विक्री व्यवहार झालेल्या जमिनींच्या तीन सेल-डीड फाईल चोरीला गेल्या आहेत. हा प्रकार लक्षात येताच उपनिबंधक नाईक यांनी गेल्या ३ सप्टेंबर रोजी म्हापसा पोलीस स्थानकात लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ३०५ कलमान्वये अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, उपनिबंधक कार्यालयातून या फाईल्स गहाळ झाल्याने कुंपणच शेत खाते का, असा संशय व्यक्त होत असून, हा प्रकार उघडकीस आल्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत. पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापसा पोलीस पुढील तपास करत आहेत.