मल्याळम चित्रपटसृष्टीत लैंगिक छळाची १७ प्रकरणे उघडकी​स

अनेक चित्रपट कलाकार, निर्मात्यांची चौकशी होण्याची शक्यता

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
28th August, 11:33 pm
मल्याळम चित्रपटसृष्टीत लैंगिक छळाची १७ प्रकरणे उघडकी​स

नवी दिल्ली : मल्याळम फिल्म इंडस्ट्रीला हादरवून सोडणाऱ्या लैंगिक छळाच्या आरोपांसंदर्भात एकूण १७ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. अनेक चित्रपट कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांची या प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. या अाराेपसत्रामुळे मल्याळम मुव्ही आर्टिस्ट असोसिएशन (एएमएमए) या संघटनेत खळबळ माजली आहे.
अभिनेत्री सोनिया मल्हारने २०१३ मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर एका अभिनेत्याने तिचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. ही तक्रार ‘#MeToo’ या लैंगिक शोषणविरोधी मोहिमेअंतर्गत केरळ सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडे दाखल करण्यात आली आहे.
अभिनेता एम. मुकेश, जयसूर्या, मणियानपिल्ला राजू आणि इदावेला बाबू यांच्यावर चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान छळ केल्याचा आरोप अभिनेत्री मिनू मुनीरने केले होते. त्यानंतर तिला धमकीचे संदेश मिळत असल्याचे तिने म्हटले आहे. तिने सोशल मीडियावर तिला मिळालेल्या धमकीच्या संदेशाचा स्क्रीनशॉट पोस्ट केला. या प्रकरणाचा तपास करणारी एसआयटी तिचा जबाब नोंदवणार आहे.
एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान मी टॉयलेटमध्ये गेले होते. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा जयसूर्याने मला मागून मिठी मारली आणि माझ्या संमतीशिवाय माझे चुंबन घेतले. मला धक्का बसला आणि मी बाहेर पळत सुटले. जर मी त्याच्यासोबत राहण्यास तयार असेन, तर आणखी काम मिळवून देण्याची ऑफर त्याने दिली होती, असे मिनू मुनीरने सांगितले. ‘एएमएमए’चे माजी सचिव इदावेला बाबूने तिला ‘एएमएमए’चे सदस्यत्व मिळवून देण्याच्या बहाण्याने आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतले आणि तिचे शारीरिक शोषण केले असा आरोपही तिने केला आहे.
बंगाली चित्रपट अभिनेत्री श्रीलेखा मित्रा हिने चित्रपट दिग्दर्शक रंजितवर विनयभंगाचा आरोप केला आहे.

‘एएमएमए’ अध्यक्षपदावरून मोहनलाल पायउतार


गेल्या आठवड्यात न्यायमूर्ती हेमा समितीच्या २३५ पानी अहवालाच्या पार्श्वभूमीवर मल्याळम चित्रपट उद्योगातील काही प्रमुख व्यक्तींवर लैंगिक शोषणाचे आरोप होत आहेत. या आराेपांच्या पार्श्वभूमीवर प्रख्यात अभिनेते मोहनलाल ‘एएमएमए’च्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले आहेत. याआधी अभिनेते सिद्दीकी यांनी सरचिटणीस पदाचा, तर रंजित यांनी चलचित्र अकादमीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. उपाध्यक्ष जयन चेरथला आणि जगदीश, खजिनदार उन्नी मुकुंदन न्सीबा हसन, सहसचिव बाबूराज, कार्यकारी समितीच्या सदस्य न्सीबा हसन, सरयू मोहन, विनू मोहन, टिनी टॉम, अनन्या, सुरेश कृष्णा, कलाभवन शाजोन, सूरज वेंजारामूडू, जोमोल, जॉय मॅथ्यू आणि टोव्हिनो थॉमस यांनीही राजीनामा दिला आहे.

हेही वाचा