राज्यातील आकडा वाढल्याने चिंता
पणजी : स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सरने गेल्या दहा वर्षांत राज्यातील १,४४३ महिलांना आपला जीव गमवावा लागला. दोन्ही प्रकारच्या कॅन्सरग्रस्त महिलांच्या मृत्यूचे प्रमाण या दहा वर्षांत वाढत गेल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लोकसभेतील लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातील आकडेवारीवरून समोर आले आहे.
मंत्री जाधव यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१४ ते २०२३ या दहा वर्षांच्या काळात गोव्यातील १,००२ महिलांचा स्तनाच्या, तर ४४१ महिलांचा गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मृत्यू झाला. प्रत्येक वर्षी दोन्हीही प्रकारच्या कॅन्सरने मृत्यू पावणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढच होत गेली आहे. केवळ गोव्यातच नव्हे, तर देशातील इतर राज्यांमध्येही महिलांच्या मृत्यूची संख्या वाढल्याचेही आकडेवारीतून दिसून येते.
‘राष्ट्रीय आरोग्य मिशन’ कार्यक्रमाअंतर्गत जागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. कॅन्सरवरील उपचारांसाठीच्या आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान प्रत्येक राज्यातील इस्पितळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत.