पणजी दिवाणी न्यायालयाचा आदेश : कोणत्याही सदस्याला आमसभा घेण्यास मज्जाव
पणजी : गोमंतक भंडारी समाजाची नवीन कार्यकारी समितीची निवडणूक घेण्यासंदर्भात ११ ऑगस्ट रोजी नियोजित वार्षिक आमसभा बोलविण्यात आली होती. ही वार्षिक आमसभा पणजी येथील दिवाणी न्यायालयाने रद्द केली आहे. याशिवाय कोणत्याही सदस्याला वार्षिक आमसभा घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश पणजी येथील दिवाणी न्यायालयाचे न्या. अंकिता नागवेकर यांनी दिला आहे.
या प्रकरणी गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक आणि सरचिटणीस फक्रु पणजीकर यांनी न्यायालयात दिवाणी याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी उपेंद्र गावकर आणि गोमंतक भंडारी समाजाच्या उपाध्यक्षाला प्रतिवादी केले आहे. त्यानुसार, माजी सरचिटणीस उपेंद्र गावकर यांनी २७ जुलै २०२४ रोजी समाजाचे मुख्य कार्यवाहक या नात्याने नोटीस जारी करून ११ ऑगस्ट रोजी वार्षिक आमसभा बोलविली होती. . याशिवाय विद्यमान समितीने १ मे २०२४ रोजी समितीच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली होती. तसेच फक्रु पणजीकर हे समाजाचे मुख्य कार्यवाहक असून त्यांनी निवडणूक संदर्भात कोणतीही नोटीस जारी केली नाही. त्यामुळे उपेंद्र गावकर यांनी जारी केलेली नोटीस रद्द करावी. तसेच समाजाच्या कोणत्याही सदस्याला नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी वार्षिक आमसभा घेण्यास मनाई करण्याचा युक्तिवाद याचिकादारातर्फे अॅड. हनुमंत नाईक यांनी न्यायालयात मांडला. या प्रकरणी न्यायालयाने सर्व पक्षाची बाजू एेकून घेतल्यानंतर वरील अंतरिम आदेश जारी केला आहे. त्यानुसार, ११ ऑगस्ट रोजी होणारी नियोजित वार्षिक आमसभा रद्द करण्यात आली आहे.
उपेंद्र गावकर यांना नोटीस
उपेंद्र गावकर हे समाजाच्या बैठकीत सलग तीन वेळा उपस्थित राहिले नसल्यामुळे त्यांना २०२० मध्ये निष्कासित करण्यात आले होते. या संदर्भात त्यांना समाजातर्फे १९ नोव्हेंबर २०२० रोजी नोटीस बजावण्यात आली होती