विधानसभेत पर्यावरण विभागाची माहिती
पणजी : गेल्या चार महिन्यांत ध्वनी प्रदूषणाच्या ४४ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. भविष्यात, ध्वनी प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी गोव्यात २० मॉनिटरिंग मशिन्स बसवण्यात येतील, असे पर्यावरण मंत्री ॲलेक्स सिक्वेरा यांनी विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले.
१ एप्रिलपासून किती ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत आणि ध्वनी प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी विभागाने कोणती यंत्रणा राबवण्याची योजना आखली आहे, अशी विचारणा मंत्र्यांना करण्यात आली. विधानसभेला माहिती देताना मंत्री म्हणाले की, गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे २२ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या संबंधित कार्यालयाकडे चार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे १५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सर्व तक्रारी संबंधित पोलीस स्थानकांत पाठवण्यात आल्या आहेत.महामंडळाकडे नोंदवण्यात आलेल्या २२ तक्रारींपैकी १६ तक्रारींवर अद्याप कार्यवाही झालेली नाही. कारवाईसाठी सहा प्रकरणे जिल्हाधिकारी, दंडाधिकारी, पोलीस आणि पंचायत यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत.
तर दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेल्या चारपैकी तीन तक्रारी पोलीस स्थानकात कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत. बाणावली कोकणी मॅग शोविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. दंडाधिकाऱ्यांची रीतसर परवानगी मिळाल्यानंतर हा कार्यक्रम पार पडला.
उत्तर गोवा दंडाधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या १५ तक्रारींपैकी दोन तक्रारी म्हापसा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्या असून उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, उर्वरित १३ प्रकरणांवर कारवाई करण्याबाबत विभागाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोव्यातील आठ ठिकाणी ऑनलाइन नॉईस मीटरही बसवण्यात येणार आहेत.
मीटर बसवण्यासाठी मोरजी, वागातोर, हणजुण, कळंगुट, कांदोळी, मांद्रे, बाणावली आणि कोलवा या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. गोव्यातील १२ भागांत ध्वनी निरीक्षण यंत्रणा उभारण्याचाही प्रस्ताव होता. पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निविदा काढण्यात आली होती. मात्र, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली नाही. आश्वे, कळंगुट, बागा, हडफडे, कांदोळी, हरमल, मोरजी, कोलवा, केळशी, मांद्रे, बाणवली, आगोंद या ठिकाणी यंत्रणा बसवण्यात येणार होती.