सासष्टीत मुसळधार पावसाने तारांबळ

काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th July, 12:00 am
सासष्टीत मुसळधार पावसाने तारांबळ

मडगाव : सासष्टी व मडगाव परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने दिवसभर दाणादाण उडवली. रविवार असल्याने शाळा, कॉलेज बंद होती, तरीही बाजारात, शेतात जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. रस्ते तसेच घरांपर्यंत पाणी आले होते. याशिवाय दोन ठिकाणी घरांवर झाडे कोसळली.

मडगाव अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवसभरात मदतीचे पाच कॉल्स आले होते. सकाळी १० वा. नेसाय औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशव्दारानजीक रस्त्यावर झाड कोसळले. त्यानंतर साडे दहा वाजता कोंब मडगाव येथील विठ्ठल मंदिरानजीकच्या रस्त्यावर झाड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. सकाळी ११ वा. वार्का कलवाडा येथे माड उन्मळून घरावर पडला. यात घराचे थोडे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी झाड तोडून बाजूला केले. तसेच दवर्ली तळेबांध येथील सिल्विया मिरांडा यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळून ५ हजारांचे नुकसान तर १० हजारांची मालमत्ता वाचवण्यात यश आले. याशिवाय कुडतरी मुशीवाडा येथील विजय व्हनगडी यांच्या घराबाजूची दरड कोसळून संरक्षक भिंत कोसळली. यात सुमारे १० हजारांचे नुकसान झाले.

दवर्लीत लोकांच्या घरात पाणी

जोरदार पावसामुळे दवर्ली येथून जाणाऱ्या महामार्गावरही पाणी साठले होते. त्यातूनच वाट काढत गाड्या जात होत्या. याशिवाय दवर्लीतील दत्तमंदिराच्या अलीकडील मार्गावरील काही घरांच्या दारापर्यंत पाणी आले होते. नजीक राहणाऱ्या व्यक्तीने मातीचा भराव टाकून पाण्याची वाट अडवून ठेवली असल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगतानाच पंचायत व आमदारांनी यात लक्ष घालण्याची मागणी केली.

मध्य रेल्वे मार्गावर पाणी, गाड्या संथगतीने

मध्य रेल्वेवरील पनवेल व काही भागात पाणी आल्याने काही ठिकाणी गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या. याचा परिणाम कोकण रेल्वेवरुन धावणाऱ्या गाड्यांवर झाला. काही रेल्वेस्थानकांवर मालगाड्या थांबवून ठेवण्यात आल्या. मध्यरेल्वेवरील वाहतूक खोळंबल्याने कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या थोड्या विलंबाने धावत आहेत.

आर्ले राय, दवर्लीत, सुरावलीत रस्त्यावर पाणी

आर्ले राय येथे, आके रिंगरोडवरील रस्त्यावर पाणी आले होते. याशिवाय नावेली मतदारसंघातील तळेबांध, डोंगरी, दवर्ली परिसरात रस्त्यावर पाणी आलेले होते. सुरावली अंडरपासमध्ये पाणी साचल्याने वाहनचालक त्यातूनच वाट काढत होते. मडगावातील काही भागात सांडपाणी वाहिन्यांच्या झाकणांतून पाणी बाहेर येण्याचे प्रकारही घडले. तळेबांध बाणावली येथील वेस्टर्न बायपासवरील पाण्याची पातळी वाढलेली दिसली नाही.