‘मंजू माई’सारख्या व्यक्तिरेखा जगण्यासाठी बळ देतात : छाया कदम

Story: कविता आमोणकर |
02nd July, 06:19 pm
‘मंजू माई’सारख्या व्यक्तिरेखा जगण्यासाठी बळ देतात : छाया कदम

गोवन वार्ता
नावेली : ‘लापता लेडिज’ या सिनेमातील ‘मंजू माई’ने मला खूप काही दिले. माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही ‘मंजू माई’ या व्यक्तिरेखेचा खूप आधार मिळाला. चित्रपटात जरी आपण सामर्थ्यवान भूमिका निभावत असलो तरी व्यक्तिगत आयुष्यात आपण खूप वेगवेगळ्या गोष्टींना तोंड देत असतो. एक व्यक्ती म्हणून जीवन जगताना मीही कधी कधी हतबल होते. छोट्या छोट्या गोष्टींचे खूप मोठे ओझे होऊन बसते. अशा वेळी ‘मंजू माई’सारख्या व्यक्तिरेखा आपल्याला जीवन जगण्याचे बळ देऊन जातात, असे प्रांजळ मत अभिनेत्री छाया कदम यांनी व्यक्त केले.
फॅन्ड्री, सैराट, झुंड, न्यूड, गंगूबाई काठेवाडी, मडगाव एक्प्रेस आणि ‘लापता लेडीज’सारख्या चित्रपटातून मराठीसह हिंदी भाषिक प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची ‘छाया’ पाडणार्‍या छाया कदम यांनी रवींद्र भवन, मडगाव येथील फिल्म क्लबच्या उद्घाटनप्रसंगी आपले अनुभव शेअर केले.
महिला सक्षमीकरणावर भाष्य करणारा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट फिल्म क्लबच्या उद्घाटन वेळेस प्रसारित करण्यात आला. सासरी जाताना दोन तरुण नववधूंची प्रवासादरम्यान अदलाबदल होते त्याची कहाणी या सिनेमात असून या चित्रपटातील मंजू माई ही त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावली.
‘मला आजही पर्सनल मेसेज येतात. कित्येक मुली आपल्या वैयक्तिक जीवनात अतिशय वेदनादायी आणि दु:खी जीवन जगत आहेत. त्यांच्यासाठी या सिनेमाने नवीन जीवन जगण्याची आस जागवली आहे. ‘मंजू माई’सारखी एक व्यक्ती आपल्या आजूबाजूला हवी, जी आपल्याला संकटाच्या काळात सकारात्मक विचार करायला भाग पाडेल, असा अभिप्राय अनेकांनी दिला’, असे त्या म्हणाल्या.
‘फॅन्ड्री’ सिनेमातील मी केलेली भूमिका आमीर खान आणि किरण खान यांना भावली. त्यामुळे मला ‘लापता लेडीज’ या भूमिकेबाबत विचारणा करण्यात आली. ‘लापता लेडीज’मधील मंजू माई ही व्यक्तिरेखा उत्तर प्रदेश मधील एका स्त्रीची आहे. ही भूमिका साकारायची माझ्यासाठी मोठे आव्हान होते. कारण आजपर्यंत मी हिंदी भाषेत जास्त भूमिका केल्या असल्या तरी त्या मराठी धाटणीच्या होत्या आणि ‘लापता लेडीज’ या सिनेमातील भूमिका ही उत्तर प्रदेशमधील एका स्त्रीची व्यक्तिरेखा होती. त्यामुळे संवादाची उच्चारफेक आदी सर्व वेगळे होते. ऑडिशनच्या वेळेस कास्टिंग डायरेक्टर रोमिल मोदी यांनी माझ्याकडून ऑडिशन करून घेतले. कधी कधी आपला आपल्यावर विश्वास नसतो. पण, आजूबाजूची माणसे आपल्यावर भरवसा ठेवतात तसेच झाले आणि मला ही भूमिका मिळाली व मी त्या भूमिकेचे सोने केले.

‘लापता लेडीज’ अशा प्रकारचे सिनेमे केल्यावर वेगळ्या प्रकारचे समाधान मिळते. अशा कलाकृती तुम्हाला आतून बाहेरून घडवतात तेव्हा त्या शेवटपर्यंत तुमच्यासोबत असतात. माझ्यासाठी हा सिनेमा तेच सर्व देऊन गेला. या चित्रपटातील भूमिका माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती. या सिनेमाची कहाणी ऐकल्यावर माझ्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी मी माझे सर्व प्रयत्न एकवटले. संवादफेक योग्य व्हावी यासाठी मी वेगळी तयारी केली. रात्री-अपरात्रीही माझ्या मनात संवाद मी म्हणत असे.
_छाया कदम, अभिनेत्री